Join us

ऑर्केस्ट्राबार गायिका निघाली सराईत चोर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 4:34 AM

बंगळुरूमधून अटकलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : खरेदीच्या बहाण्याने शॉपिंग मॉलमधील नामांकित शोरूम, तसेच पार्लरमध्ये जाऊन तेथून पर्स चोरून ...

बंगळुरूमधून अटक

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : खरेदीच्या बहाण्याने शॉपिंग मॉलमधील नामांकित शोरूम, तसेच पार्लरमध्ये जाऊन तेथून पर्स चोरून पसार होणाऱ्या सराईत महिलेला गुन्हे शाखेच्या कक्ष ५ ने बंगळुरूमधून अटक केली. ती ऑर्केस्ट्राबार गायिका आहे.

गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार, ६ एप्रिल रोजी लोअर परळ येथील एका मॉलमधील शोरूममधून महिला ग्राहकाची १४ लाख ९० हजारांचा ऐवज असलेली दागिन्यांची बॅग चोरीला गेली. तक्रारीनुसार, एन.एम. जोशी मार्ग पोलिसांनी गुन्हा नोंद करत तपास सुरू केला. यापूर्वीही येथील मॉलसह शिवाजी पार्क येथील एका पार्लरमध्ये चोरीच्या घटना घडल्याचे समोर आले हाेते.

गुन्हे शाखेच्या कक्ष ५ ने याचा समांतर तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक बाबींतून कक्ष ५चे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदीश साईल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक योगेश चव्हाण, सहायक पोलीस निरिक्षक सुरेखा सौंजाळ, महेंद्र पाटील, अमोल माळी, पोलीस उपनिरीक्षक महेश बंडगार आणि पोलीस अंमलदार यांनी बंगळुरूधून मुनमुन हुसेन उर्फ अर्चना बरुआ उर्फ निकी हिला नुकतेच ताब्यात घेतले. तिच्याकडून एन.एम. जोशी पोलीस ठाण्यातील दाखल गुन्ह्यातील सर्व ऐवज जप्त केला.

निकीविरुद्ध मुंबईसह (१), बंगळुरू (५), हैदराबाद (२), कोलकाता (१) असे एकूण ९ गुन्हे नोंद आहेत, तसेच राज्यभरात तिने अशा प्रकारे चोरी केल्याचा संशय पोलिसांना आहे.

* विमानाने करायची ये-जा

ऑर्केस्ट्राबारमध्ये गायिका म्हणून काम करत असताना २००९ मध्ये तिने पहिली चोरी केली. पहिला प्रयत्न यशस्वी होताच, जास्तीच्या पैशांसाठी चोरी करण्यास सुरुवात केली. यात विमानाने ठरलेले ठिकाण गाठायचे आणि चोरी करून पुन्हा बंगळुरूला रवाना होत. तिच्या उच्च राहणीमानामुळे तिच्यावर कुणी संशय घेत नसे.

..........................................