मुंबई : मालाड मार्वे परिसरात भूमाफियांकडून होणाऱ्या तिवरांच्या कत्तलीची महाराष्ट्र राज्य किनारपट्टी व्यवस्थापन प्राधिकरणाने गंभीर दखल घेतली असून, याबाबत चौकशी करून कारवाई करण्याचे तसेच त्याबाबतचा अहवाल सादर करण्याचे आदेश विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त आणि मुख्य वनसंरक्षक यांना दिले आहेत. मालाड (पश्चिम) येथील एव्हरशाइन नगर परिसरात भूमाफियांनी झोपड्या उभारण्यासाठी मोठ्या प्रमाणावर तिवरांची कत्तल केल्याची तक्रार जनमुक्ती मोर्चाचे अध्यक्ष मानव जोशी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. या कत्तलीमुळे पर्यावरणाची मोठ्या प्रमाणावर हानी होऊन प्रदूषणातही भर पडत असल्याकडे जोशी यांनी लक्ष वेधले होते. या कत्तलीकडे महापालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील संबंधित अधिकारी हेतुपुरस्सर डोळेझाक करीत असल्याचाही आरोप त्यांनी निवेदनात केला होता. सोबत जोशी यांनी छायाचित्रेही सादर केली होती. या निवेदनाची दखल घेत ंमहाराष्ट्र राज्य किनारपट्टी व्यवस्थापन प्राधिकरण विभागीय आयुक्त कोकण विभाग, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त आणि मुख्य वनसंरक्षक अधिकारी यांना या प्रकरणाची चौकशी करून आवश्यक ती कारवाई करण्याचे आदेश दिले. या प्रकरणी सीआरझेड अधिनियमांचा तसेच सर्वोच्च न्यायालयाने ६ आॅक्टोबर २00५ आणि २७ जानेवारी २0१0 रोजी दिलेल्या आदेशांचा भंग होत असल्याचे आढळल्यास त्वरित प्राधिकरणाकडे केलेल्या कारवाईचा अहवाल सादर करावा, असेही या आदेशात नमूद करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
तिवरांच्या कत्तलीप्रकरणी कारवाईचे आदेश
By admin | Published: April 13, 2015 2:55 AM