मुंबई : वाढदिवस साजरा करण्यासाठी बोटीवर पार्टीसाठी ३५ ते ४० जण जमले खरे, मात्र वाढदिवस साजरा करतानाच बोटीत पाणी भरल्याने त्यांचा जीव धोक्यात आला होता. जीवाच्या आकांताने आरडाओरड केल्यावर परिसरात असलेल्या लाँचधारकाने प्रसंगावधान राखत त्यांना आपल्या लाँचमध्ये घेतल्याने त्यांचे प्राण वाचले. रविवारी सायंकाळी ही घटना घडली.सुमारे ४० जण वाढदिवसाची पार्टी करण्यासाठी रविवारी सायंकाळी गेट वे आॅफ इंडियाजवळ बोटीवर जमले होते. पार्टी सुरू असताना बोटीचा खिळा निखळल्याने बोटीत पाणी भरले गेले. बोट बुडू लागल्याने बोटीवरील सर्वांचा जीव धोक्यात आला होता. या ४० जणांचा जीव वाचवण्याचे काम गेट वे आॅफ इंडिया ते एलिफंटा या मार्गावर वाहतूक करणाऱ्या लाँचधारकाने केले आहे. या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.वाढदिवस साजरा करण्यासाठी गेट वे आॅफ इंडिया समोरील समुद्रात बोटीवर सुमारे ३५ ते ४० जण एका छोट्या बोटीतून गेले होते. वाढदिवसाची पार्टी करण्यात हे तरुण गुंग असताना अचानक बोटीमध्ये पाणी भरू लागल्याने सर्वांची तारांबळ उडाली व आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली.सर्वांनी जीव वाचवण्यासाठी आरडाओरडा केला. आरडाओरडा ऐकून या परिसरात असलेल्या व एलिफंटा येथून गेट वे आॅफ इंडियाकडे परतणाºया लाँचवरील कॅप्टन नामक व्यक्तीने आपली लाँच या बोटीकडे तत्परतेने नेली व त्यामध्ये अडकलेल्या सर्वांना आपल्या लाँचवर घेऊन त्यांना सुखरूप गेट वे आॅफ इंडियावर आणले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे.मुंबई पोर्ट ट्रस्ट व महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डातर्फे या दुर्घटनेची संयुक्तपणे चौैकशी केली जात आहे. दुर्घटनास्थळ हे अशा प्रकारच्या बोटींना समुद्रात उभे राहण्यासाठी सुरक्षित आहे का, याची चौकशी केली जाणार आहे.त्याशिवाय दुर्घटनाग्रस्त बोटीचे निरीक्षण योग्य प्रकारे झाले होते का व ती सुस्थितीत होती का, याबाबतची चौकशी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डातर्फे केली जाणार आहे. अशा प्रकारची घटना पुन्हा घडू नये यासाठी मुंबई बंदर परिसरात समुद्रात उभ्या असलेल्या सर्व बोटींची तपासणी करण्याचा विचार मुंबई पोर्ट ट्रस्टतर्फे करण्यात येत आहे.>जीवरक्षक तैनात करागेट वे आॅफ इंडिया परिसराजवळ अशा प्रकारे अनेक बोटी उभ्या केल्या जातात. त्यांच्या सुरक्षेसोबत कोणतीही हलगर्जी होऊ नये व पर्यटकांचा जीव धोक्यात येऊ नये यासाठी आवश्यक ती काळजी घेण्याची गरज आहे, असे मत दामोदर तांडेल यांनी व्यक्त केले. गेट वे आॅफ इंडिया येथे जीवरक्षक मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात यावेत, अशी मागणी तांडेल यांनी केली. ज्या बोटींना अशा प्रकारे परवाना देण्यात आला आहे़, त्यांची तपासणी अतिशय कठोरपणे करावी असे त्यांनी सुचवले आहे.
गेट वेजवळील बोट दुर्घटनेच्या चौकशीचे प्रशासनाकडून आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: January 08, 2020 12:50 AM