लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : ग्रामीण भागातील कोरोनास्थितीबाबत न्यायालयाने चिंता व्यक्त केली. कोरोनाच्या पहिल्या लाटेची फारशी झळ ग्रामीण भागांना लागली नाही. मात्र, दुसरी लाट तेथे पोहोचली आहे. त्यामुळे तिथे कोरोनाव्यवस्थापन प्रभावीपणे लागू करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना द्या, असे निर्देश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले.
पालघर जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या स्थितीबाबत एक वृत्तवाहिनेने प्रसारित केलेल्या वृत्ताची दखल घेत मुख्य न्या. दीपांकर दत्ता व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने म्हटले की, आम्ही शहरातील स्थितीचा आढावा घेतला आहे. आता आम्ही ग्रामीण भागातील स्थिती पाहू. राज्य सरकारने ग्रामीण भागातील जिल्हाधिकाऱ्यांना काही निर्देश द्यावेत. त्या भागातील काहीच रेकॉर्डवर नाही. तेथील रुग्णांचे व नातेवाइकांची मुलाखत घेण्यात आली आणि या मुलाखती डोळे उघडणाऱ्या आहेत, असे न्यायालयाने म्हटले.