मुंबई - अनुसूचित जाती प्रवर्गातील वरिष्ठ शिक्षकाने बढती मागितल्याने त्याला मारहाण करून जातिवाचक टिप्पणी केल्याप्रकरणी पुण्याच्या शिक्षकावर अॅट्रोसिटी अॅक्टअंतर्गत गुन्हा नोंदविला. अटकपूर्व जामिनासाठी आलेल्या या शिक्षकाचा अर्ज मंजूर करताना उच्च न्यायालयाने त्याला सामाजिक कार्य करण्याची शिक्षा ठोठावली. तीन रविवार बुद्धविहारमध्ये विद्यार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे धर्मनिरपेक्षतेबाबतचे विचारांचे महत्त्व पटवून देण्याचे, तसेच एका शाळेमध्ये ५० रोपटी लावण्याचे सामाजिक कार्य करण्याचा आदेश उच्च न्यायालयाने संबंधित शिक्षकाला दिला.पुण्याच्या एका एज्युकेशन सोसायटीचा सदस्य संभाजी शिरसाट यांनी त्यांचे वरिष्ठ सहकारी मधुकर बाहुले यांना मारहाण व जातिवाचक टिप्पणी केल्याबाबत मारहाण व अॅट्रोसिटी अॅक्टअंतर्गत गुन्हा नोंदविला. त्यामुळे शिरसाट यांनी पुणे सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला. न्यायालयाने तो फेटाळल्याने तो उच्च न्यायालयात गेला. या अर्जावरील सुनावणी न्या. साधना जाधव यांच्या एकसदस्यीय खंडपीठापुढे होती.तक्रारीनुसार, ४० शिक्षकांचे थकीत वेतन मागण्यासाठी शिरसाट यांनी शिक्षण अधिकाऱ्यांची भेट घेतली. भेटीदरम्यान बाहुले यांनी आपण या शाळेत सर्वात वरिष्ठ असल्याने मुख्याध्यापक म्हणून नियुक्ती करण्याची मागणी केली. कारण हे दोन्ही शिक्षक शिकवत असलेल्या शाळेचे मुख्याधापकपद रिक्त होते. त्यांची मागणी शाळेने व पुढे शिक्षण अधिकाऱ्यांनीही फेटाळली. दरम्यान बाहुले, शिरसाट यांच्यात वाद झाले. शिरसाट यांनी बाहुले यांना जातिवाचक टिप्पणी केली. शिरसाट व अन्य शिक्षकांनी बाहुले यांना मारहाण केली. याबाबत बाहुले यांनी शिरसाट व सहकाºयांवर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला.पुणे सत्र न्यायालयाने अन्य शिक्षकांचा अटकपूर्व जामीन मंजूर केला. कारण त्यांनी बाहुले यांना मारहाण केली. मात्र, शिरसाटने बाहुले यांना जातिवाचक शिवीगाळ केल्याने त्याचा अटकपूर्व जामीन नामंजूर केला.न्यायालयाने सुनावलेली शिक्षाउच्च न्यायालयाने शिक्षकाचीच शिकवणी घेत शिरसाट यांना सामाजिक कार्य करण्याची शिक्षा सुनावली. अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर व्हावा, यासाठी शिरसाट यांनी स्वत:हून पुण्यातील मंगळवार पेठ येथील बुद्धविहारमध्ये अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जातीयवाद नष्ट करण्यासाठी व धर्मनिरपेक्षतेचा प्रसार करण्यासंदर्भात लिहिलेले लेख व साहित्याची माहिती देण्याची तयारी दर्शवली. तसेच पुण्यातील एका खासगी विनाअनुदानित शाळेत ५० रोपटी लावण्यासही ते तयार झाले. न्यायालयाने शिरसाट यांना ५० हजारांच्या जातमुचलकाही भरण्याचे निर्देश दिले.
शिक्षकाला शिस्त लावण्यासाठी बुद्धविहारात शिकविण्याचा आदेश, उच्च न्यायालय
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2019 7:05 AM