इच्छा नसताना आदेश म्हणून वारिस पठाण रिंगणात?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2019 07:06 AM2019-03-19T07:06:10+5:302019-03-19T07:06:23+5:30
भायखळा मतदारसंघातील एमआयएमचे आमदार अॅड. वारिस पठाण यांना मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीतर्फे निवडणूक रिंगणात उतरवण्याची तयारी सुरू आहे.
- खलील गिरकर
मुंबई - भायखळा मतदारसंघातील एमआयएमचे आमदार अॅड. वारिस पठाण यांना मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीतर्फे निवडणूक रिंगणात उतरवण्याची तयारी सुरू आहे. पक्षाचा आदेश म्हणून मी रिंगणता उतरतो आहे. पण लोकसभा लढवण्याची माझी इच्छा नाही, असे त्यांनी लगोलग स्पष्ट केले आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी एमआयएमसाठी औरंगाबाद अणि मुंबईतील उत्तर मध्य असे दोन लोकसभा मतदारसंघ सोडले आहेत.
उत्तर मध्य मुंबईतील वांद्रे पूर्व, कलिना व कुर्ला या मतदारसंघातील अल्पसंख्याक आणि दलित समाजातील समाजाच्या मतांची गणिते लक्षात घेत एमआयएम या निवडणूकीत उतरणार आहे. पक्षाचा मुंबईतील चेहरा म्हणून पठाण यांना तेथून लढण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती एमआयएमच्या सूत्रांनी दिली. २०१४ मधील विधानसभा निवडणुकीत एमआयएमच्या अविनाश बर्वे यांना कुर्ला मतदारसंघात २५ हजार ७४१ मते मिळाली होती. वांद्रे पूर्व मतदारसंघात रहबर खान यांना २३ हजार ९७६ मते मिळाली होती. मात्र, २०१५ च्या पोटनिवडणूकीत हे प्रमाण घटून खान यांना १५ हजार मतांवर समाधान मानावे लागले होते. पक्षाचे औरंगाबाद येथील आमदार इम्तियाज जलील यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याची ठाम भूमिका मांडली होती. त्यातून वाद झाला होता. त्यानंतर दोन मतदारसंघ पक्षाला मिळाले. पण त्यातील मुंबईच्या मतदारसंघात इच्छा नसतानाही पठाण यांना उतरवले जात असल्याचे चित्र उभे राहिले आहे.
लोकसभा निवडणूक लढवण्याचा माझा कोणताही विचार नाही. मी आमदार म्हणून भायखळा मतदारसंघात काम करत असून विधानसभेसाठी तयारी करीत आहे. मात्र पक्षाने जबाबदारी दिल्यास येथून ठिकाणी निवडणूक लढवेन.
- अॅड. वारिस पठाण,
आमदार, भायखळा