मुंबई : मुंबई सेंट्रल येथील अग्निग्रस्त सिटी माॅलची मुंबई शहराचे पालकमंत्री व राज्याचे मत्स्यव्यवसाय, वस्त्रोद्योग व बंदर खात्याचे मंत्री अस्लम शेख यांनी आज दुपारी भेट देऊन पाहणी केली. तसेच सदर दुर्घटनेच्या चौकशीचे आदेशही त्यांनी दिले.
मुंबई सेंट्रलमधील सिटी सेंटर मॉलमध्ये काल रात्री नऊ च्या सुमारास भीषण आग लागली. गेल्या २० तासांपासून अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. परंतू अद्याप आग आटोक्यात आलेली नाही. या आगीत मॉलमध्ये अडकलेल्या 400 हून अधिक नागरिकांची अग्निशमन दलाकडून सुखरुप सुटका करण्यात आली आहे. तर आग विझवण्याच्या प्रयत्नात अग्निशमन दलाचा एक जवान जखमी झाला आहे.
दरम्यान काही दिवसांपूर्वी वरळी भागात देखील स्फोट हऊन किरकोळ आग लागली होती. त्यानंतर काही दिवसांनी दक्षिण मुंबईमध्येच क्रॉफर्ड मार्केट मध्ये क्रॉकरीच्या मार्केटमध्ये आगीचा भडका उडाला होता तो देखील विझवण्यासाठी फायर ब्रिगेडच्या कर्मचार्यांना 2 दिवस लागले होते.