मुंबई- 'मुंबई आणि परिसरात येत्या काही दिवसात अतिवृष्टीची शक्यता असून या काळात ग्राहकांना सुरक्षित व अखंड वीजपुरवठा देण्याकरता सज्ज राहा. याकरिता सर्व अधिकाऱ्यांनी मुख्यालय सोडू नये तसेच या काळात अधिकारी व कर्मचा-यांनी सुट्टीवर जाऊ नये,' अशा सक्त सूचना महावितरणच्या कोकण प्रादेशिक विभागाचे प्रादेशिक संचालक सतीश करपे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. भांडुप नागरी परिमंडळात आज आयोजीत आढावा बैठकीत प्रादेशिक संचालक सतीश करपे बोलत होते. यावेळी भांडुप नागरी परिमंडळाच्या मुख्य अभियंता पुष्पा चव्हाण उपस्थित होत्या.
सतीश करपे पुढे म्हणाले, 'अतिवृष्टीच्या काळात प्रत्येक उपविभागात अधिकाऱ्यांच्या कामाचे वेळापत्रक तयार करून ठेवावे. चोवीस तास एक अभियंता, लाईन स्टाफ तसेच विविध कामाशी संबंधित ठेकेदारांचे कर्मचारी उपस्थित राहतील अशी योजना करावी. उद्भवू शकणाऱ्या विविध अडचणी लक्षात घेऊन त्याकरता सर्व आवश्यक साहित्य उपलब्ध ठेवावे.' तसेच या कामात हलगर्जीपणा केल्यास अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कडक कार्यवाही करण्यात येईल असा इशारा त्यांनी यावेळी दिला. नियमित कामाचा आढावा घेताना मुख्य अभियंता पुष्पा चव्हाण म्हणाल्या, 'पिलर,ऑईल, वृक्ष छाटणी, आवश्यक तेथे केबल बदलणे आदी कामे पूर्ण झाली असल्याची खात्री करा. तसेच पावसामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण कमीत कमी ठेवण्याकरता प्रयत्नशील राहा.'
या बैठकीस उप महाव्यवस्थापक (मा.वतं.)योगेश खैरणार, भांडुप विभागाचे कार्यकारी अभियंता राजेश थूल, मुलुंड विभागाच्या कार्यकारी अभियंता सारिका खोब्रागडे, वागळे इस्टेटचे कार्यकारी अभियंता अनिल पाटील, ठाणे-1 विभागाचे कार्यकारी अभियंता अरविंद बुलबुले, ठाणे-2 विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक थोरात, ठाणे-3 विभागाचे कार्यकारी अभियंता पांडुरंग हुंडेकरी, नेरुळ विभागाचे कार्यकारी अभियंता सिंहाजीराव गायकवाड, वाशी विभागाचे कार्यकारी अभियंता प्रवीण अन्नछत्रे, पनवेल विभागाचे कार्यकारी अभियंता माणिक राठोड,ठाणे चाचणी विभागाचे कार्यकारी अभियंता प्रकाश राऊत, वाशी चाचणी विभागाचे कार्यकारी अभियंता संजय पाटील, प्रणाली विश्लेषक अर्चना प्रेमसागर व मिनेश खंडेलवाल, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी महेंद्र चुनारकर व जनसंपर्क अधिकारी विश्वजीत भोसले तसेच भांडुप परिमंडळाअंतर्गत येणाऱ्या 28 उपविभागातील अतिरिक्त कार्यकारी अभियंता उपस्थित होते.