आदेश पाळले, मतदान केले; पण चलबिचल सुरू

By admin | Published: June 4, 2016 01:41 AM2016-06-04T01:41:50+5:302016-06-04T01:41:50+5:30

ठाणे आणि पालघर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार रवींद्र फाटक आणि राष्ट्रवादीचे उमेदवार वसंत डावखरे यांचे राजकीय भवितव्य मतपेटीत बंद झाले खरे

Order passed, voted; But the walk | आदेश पाळले, मतदान केले; पण चलबिचल सुरू

आदेश पाळले, मतदान केले; पण चलबिचल सुरू

Next

ठाणे : ठाणे आणि पालघर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार रवींद्र फाटक आणि राष्ट्रवादीचे उमेदवार वसंत डावखरे यांचे राजकीय भवितव्य मतपेटीत बंद झाले खरे, पण आघाडीतील डावखरेंचे विरोधक आणि महायुतीतील फाटकांच्या विरोधकांत मतदान होईपर्यंत चांगलीच चलबिचल होती.
निकालावेळी काही दगाफटका घडल्याचे स्पष्ट झाले, तर आपल्यावर बालंट नको म्हणून काहींनी आपापल्या परीने फोटो काढण्याचा, काही खुणा करण्यासाठी पेनचा वापर करण्याचा प्रयत्न केला खरा; पण निवडणूक आयोगाने मोबाइल, पेनसारख्या साधनांना मज्जाव केल्याने ते हिरमुसले.
आपण आपल्याच उमेदवाराला मत दिले, आदेश पाळले, राजकीय भवितव्य पणाला लावलेले नाही, हे उमेदवाराला-नेत्यांना समजावे, यासाठी काहींनी मतदान केंद्रावर मोबाइल नेण्याचा अट्टहास केला. परंतु, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी तो हाणून पाडला. फाटक पडले तर त्याचे खापर त्यांच्या विरोधी गटावर आणि डावखरे पडले तर त्याचे खापर हे त्यांच्या विरोधी गटावर फोडले जाणार, हे नक्की असल्याची चर्चा मतदानाच्या परिसरात रंगली होती. त्यामुळे मत दिले तरी टेन्शन आणि उमेदवार पडला तर अधिकच टेन्शन, या विवंचनेत काही मतदार दिसून आले.
विधान परिषदेच्या एका जागेसाठी प्रथमच तुल्यबळ लढत होते आहे. बहुतांश स्थानिक स्वराज्य संस्थांत सत्ता उपभोगणाऱ्या शिवसेनेकडे अधिक मते असतानाही त्यांनादेखील काहीसे टेन्शन होते. त्याच वेळी राष्ट्रवादी गाफील नसल्याने हितेंद्र ठाकूर यांनी बहुजन विकास आघाडीच्या माध्यमातून त्यांना सहकार्य केल्याने, त्यांच्या आशा उंचावल्या आहेत. छोटे पक्ष, अपक्ष यांची भूमिका शेवटच्या दोन दिवसांपर्यंत तळ्यात-मळ्यात होती. त्यांच्या पाठिंब्याबाबत एकीकडे डावखरे दावा करत होते, तर सत्तारूढ पक्षासोबत ते हमखास असतील, असा शिवसेनेचा दावा होता.
असे असले तरी या दोन्ही उमेदवारांविरोधात दोन्ही पक्षांत काही गट सक्रिय असल्याने किंबहुना दोनही पक्षांत त्यांच्या विरोधातील गट प्रभावी असल्याने या दोन्ही उमेदवारांचे टेन्शन वाढले आहे. त्यांच्याविरोधात असलेल्या गटातील नगरसेवकांची मात्र मतदान केंद्राच्या ठिकाणी फार चलबिचल सुरू होती.
विधानसभा निवडणुकीच्या वेळी फाटक यांचा जेव्हा पराभव झाला होता, तेव्हा त्याचे भोग त्यांच्या विरोधात असलेल्या पदाधिकाऱ्यांना भोगावे लागले होते. पक्षाने त्यांची चांगलीच कानउघाडणी केली होती. आता विधान परिषदेच्या निवडणुकीत ही चूक सहन केली जाणार नाही, असा सज्जड दमच नेत्यांनी भरला आहे. मुख्यमंत्र्यांनी तर जरा जरी चूक झाली, तर राजकीय कारकीर्द संपुष्टात आणण्याचे धमकीवजा आदेश दिले आहेत. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनीही सर्वांना एकत्रित काम करण्याच्या ‘आपल्या पद्धतीने’ सूचना दिल्या होत्या. काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही सर्वांना एकत्रित काम करण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे पक्षश्रेष्ठींचा आदेश डावलल्याचे समजले, तर कारवाई होण्याच्या शक्यतेची टांगती तलवार दोन्ही पक्षांतील नगरसेवकांवर असल्याने मतदान केले तरी टेन्शन आणि उमेदवार निवडून आला नाही तरी टेन्शन, अशा द्विधा मन:स्थितीत मतदानासाठी आलेले नगरसेवक दिसत होते. आपण दिलेले मत हे आपल्या उमेदवाराला समजावे आणि या विमनस्कतेतून सुटका व्हावी, म्हणून काही मतदारांनी मतदान केंद्रात मोबाइल नेण्याचा हट्ट धरला. परंतु, तो प्रयत्न फोल ठरला. (प्रतिनिधी)

भाजपा आमदाराविरोधात आचारसंहिता भंगाची तक्रार
कल्याण : भाजपाचे कल्याण पश्चिमचे आमदार नरेंद्र पवार यांनी आचारसंहितेचा भंग केल्याची तक्रार काँग्रेस पक्षाने शुक्रवारी एमएफसी पोलिस ठाण्यात केली. विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता असताना सहजानंद चौकात आमदार पवारांनी पक्षाच्या चिन्हाचा बॅनर लावल्याप्रकरणी युवक काँग्रेसचे राहुल शर्मा यांनी ही तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी आमदारांविरोधात शहर विद्रुपीकरणाचा गुन्हा नोंदविला आहे. दरम्यान, मी आचारसंहितेचा भंग केलेला नाही, असे स्पष्टीकरण पवार यांनी दिले आहे.

अंबरनाथमध्ये कडेकोट व्यवस्था
काँग्रेसचा एक नगरसेवक फरार असल्याने तो गैरहजर राहिल्याचा अपवाद वगळता अंबरनाथ-बदलापूरमध्ये निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली. अंबरनाथमधील काँग्रेसचे नगरसेवक सुरेंद्र यादव हे बुवापाडा परिसरातील हाणामारीच्या प्रकरणात फरार असल्याने त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला नाही. अंबरनाथमध्ये सर्वप्रथम मतदानाचा हक्क काँग्रेसचे गटनेते प्रदीप पाटील यांनी बजावला. आघाडीच्या सर्व नगरसेवकांनी सकाळी १० च्या आतच मतदान केले. तर, १०.३० नंतर शिवसेना आणि भाजपा युतीच्या मतदारांनी मतदानाला सुरुवात केली. काही नगरसेवक मतदान छुप्या कॅमेऱ्यात टिपण्याची शक्यता असल्याने पेन, चारचाकी गाडीची चावी, गॉगल आणि मोबाइल नेण्यावर बंदी घालण्यात आली होती. हातातील आणि खिशातील सर्व वस्तू बाहेर ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. या केंद्राला उमेदवार वसंत डावखरे आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट दिली.

भिवंडी : की चेनला लावलेल्या उपकरणाच्या साह्याने मतपत्रिकेची प्रत स्कॅन करण्याचा प्रयत्न करताना भिवंडीतील समाजवादी पक्षाच्या नगरसेविका नूरजहाँ रफिक अहमद अन्सारी यांना तहसीलदारांनी पोलिसांच्या ताब्यात दिले. त्या उपकरणाची तपासणी करून शनिवारी त्यांच्यावर पुढील कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Order passed, voted; But the walk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.