मुंबई : मुंबईतल्या रस्त्यालगतच्या बहुतांशी झाडांना कीड लागू नये म्हणून गेरूचे लेपन करण्यात आले आहे. पावसाळा संपला की मुंबईतल्या झाडांना गेरूचे लेपन करण्याची प्रक्रिया सुरू केली जाते. मुंबईतल्या रस्त्यांलगत १ लाख ८० हजार झाडे आहेत. यापैकी एक ते दीड लाख झाडांना कीड लागू नये म्हणून गेरूचे लेपन करण्यात आले आहे. या प्रक्रियेची दखल पहिल्यांदा मलेशियाने घेतली आहे. युरोपातील देशांनीसुद्धा याची दखल घेत त्यांच्याकडे असे प्रयोग करत मुंबई महापालिकेच्या कामाचा कित्ता गिरवित आहेत.
इंग्लंडसारख्या प्रगत देशांचा अत्याधुनिक तंत्रज्ञानावर विश्वास असतो. आपल्याकडे मात्र आपण आपली पारंपरिक पद्धत वापरतो. झाडांना जमिनीतून जे बुरशीजन्य रोग लागतात ते लागू नये म्हणून आपण झाडांना गेरूचे लेपन करतो. यामुळे किडीवर नियंत्रण मिळविले जाते. त्यामुळे आपली जुनी पद्धत जास्त परिणामकारक आहे. तीसुद्धा तेवढीच गरजेची आहे. हेच त्याचे महत्त्व आहे. परदेशात जे तंत्रज्ञान आहे ते वरच्या बाजूने आहे. ते झाडावर वरून उपचार करतात. जमिनीतील कीड जमिनीतीच राहते. झाडांना अनेक वेळा कीड जमिनीतून लागते. गेरूचे लेपन केल्याने यावर नियंत्रण मिळविता येते, अशी माहिती मुंबई महापालिकेचे उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी दिली. अधिक पावसाच्या परिसरात झाडांना बुरशी लागण्याचे प्रमाण जास्त असते. अशा वेळी बुरशी लागू नये म्हणून आम्लीय गुणधर्म असणारा गेरू झाडांच्या खोडांना लावला जातो. अल्कधर्मी गुणधर्म असणारा चुना लावला जातो.