Join us  

मारहाणप्रकरणी सलमानविरुद्ध गुन्हा नोंदविण्याचे आदेश

By admin | Published: April 09, 2015 5:01 AM

भ्रष्टाचार निर्मूलन समिती’चे सदस्य रवींद्र द्विवेदी यांना मारहाण केल्याप्रकरणी अभिनेता सलमान खान आणि त्याच्या अंगरक्षकावर गुन्हा दाखल करण्याचे

मुंबई : ‘भ्रष्टाचार निर्मूलन समिती’चे सदस्य रवींद्र द्विवेदी यांना मारहाण केल्याप्रकरणी अभिनेता सलमान खान आणि त्याच्या अंगरक्षकावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश अंधेरी दंडाधिकारी न्यायालयाने विमानतळ पोलिसांना दिले. गेल्या वर्षी ४ नोव्हेंबरला दिल्लीला निघालेल्या विमानात सलमान आणि त्याचा अंगरक्षक विशाल यांनी शिवीगाळ करत मारहाण केल्याचा आरोप द्विवेदी यांनी केला आहे. तसेच आपल्याकडील महत्त्वाची व गोपनीय कागदपत्रेही त्यांनी हिसकावल्याचा दावा द्विवेदी यांनी केला होता. या प्रकरणी त्यांनी अंधेरी न्यायालयात खासगी तक्रार केली होती. द्विवेदी यांनी तक्रार केल्यानंतर याबाबत आम्ही चौकशी केली. मात्र त्या तक्रारीमध्ये काही तथ्य न आढळल्याने आम्ही कोणत्याही प्रकारची कारवाई केली नसल्याचे, विमानतळ पोलिसांनी न्यायालयाला सांगितले. त्यावरील सुनावणीत न्यायालयाने विमानतळ पोलिसांना दखलपात्र गुन्हा नोंदवून तपास करण्याचे आदेश दिले.भाजपाचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांचा मृत्यू अपघाती नसून त्यांची हत्या झाली होती हे स्पष्ट करणारी कागदपत्रे माझ्याकडे होती. ती सलमान व त्याच्या अंगरक्षकाने हिसकावून घेतली, असा दावाही द्विवेदी यांनी आपल्या तक्रारीतून केला होता. याआधी द्विवेदी यांनी केलेल्या तक्रारीनुसार झालेल्या तपासात सलमानविरोधात एकही पुरावा सापडला नव्हता, ही माहिती आम्ही न्यायालयाला दिली होती, असे विमानतळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र नागभिरे यांनी सांगितले. मात्र न्यायालयाने आम्हाला या प्रकरणी गुन्हा नोंदविण्याचे आदेश दिले आहेत. आज रात्री आम्ही हे काम पूर्ण करू, असेही ते म्हणाले. या प्रकरणाची फेरतपासणी पोलीस करणार आहेत. सलमान आणि त्याच्या अंगरक्षकावर जबरी चोरी, मारहाण, शिवीगाळ या कलमान्वये गुन्हा नोंद होऊ शकतो. (प्रतिनिधी)