शाहरूख खानला बचावासाठी तीन महिने, आवश्यक कागदपत्रं सादर करण्याचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2018 08:47 AM2018-02-05T08:47:14+5:302018-02-05T08:47:54+5:30
अलिबाग येथील सील केलेल्या कोट्यवधीच्या अलिशान फार्महाउसबाबत बचावासाठी आवश्यक कागदपत्रे सादर करण्यासाठी, अभिनेता शाहरूख खानला आयकर विभागाने नोटीस बजावली आहे.
मुंबई : अलिबाग येथील सील केलेल्या कोट्यवधीच्या अलिशान फार्महाउसबाबत बचावासाठी आवश्यक कागदपत्रे सादर करण्यासाठी, अभिनेता शाहरूख खानला आयकर विभागाने नोटीस बजावली आहे. तीन महिन्यांचा कालावधी त्याला देण्यात आला आहे. पुराव्यानिशी समाधानकारक खुलासा सादर न केल्यास, त्याला फौजदारी कायद्यांतर्गत कारवाईला सामोरे जावे लागेल, असे आयकर विभागातील सूत्रांकडून सांगण्यात आले.
अलिबाग येथील समुद्रकिनाऱ्याशेजारील १९ हजार ९६० चौरस मीटर जागेतील बंगला बेनामी प्रॉपट्री ट्रॅन्झेक्शन प्रतिबंधक कायद्यान्वये (पीबीपीटी) सील केला आहे. शेतजमीन असल्याचे भासवून या ठिकाणी सर्व आधुनिक सोयी असलेला बंगला बांधण्यात आला. या ठिकाणी हेलिपॅड, स्वीमिंग टॅँकसह अन्य सर्व सुविधा उपलब्ध आहेत. सीआरझेडचे पूर्णपणे उल्लंघन केल्याचे आयकर विभागाने केलेल्या तपासणीतून स्पष्ट झाले आहे. त्याचप्रमाणे, त्याचे पूर्वाश्रमीचे सीए मोरेश्वर आजगावकर यांनी आयकर विभागाला दिलेल्या जबाबात शाहरूखच्या सांगण्यावरून सर्व बनावट कागदपत्रे वापरण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे फार्महाउसच्या वैधतेबाबत त्याच्यापुढील अडचणी वाढल्या आहेत.
परवानगीचे प्रमाणपत्र देण्याची सूचना
अलिबाग येथील शाहरूखच्या मालकीचे ‘डेजा व्हू’ फार्म हाउस आयकर विभागाने गेल्या आठवड्यात सील केल्यानंतर, त्याला पुन्हा नोटीस बजाविण्यात आली आहे. त्यात ही मालमत्ता सरकारने ताब्यात का घेऊ नये? त्याचप्रमाणे, फार्म हाउस बांधण्यासाठी विविध विभागांकडून घेण्यात आलेल्या परवानगीचे प्रमाणपत्र सादर करण्याची सूचना केली आहे. त्यासाठी ९० दिवसांचा कालावधी देण्यात आला असून, तोपर्यंत नोटीसचे उत्तर न दिल्यास शासनाची फसवणूक केल्या प्रकरणी शाहरूखला फौजदारी कारवाईला सामोरे जावे लागेल, असे नोटिशीत नमूद करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.