डोंबिवली आग : ‘मेट्रोपॉलिटन एक्झिमकेम’ला उत्पादन बंद करण्याचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2020 06:58 AM2020-02-20T06:58:44+5:302020-02-20T11:23:10+5:30
मालक, व्यवस्थापनाला नोटीस; आगीमुळे इमारत धोकादायक
कल्याण - रसायनांच्या साठ्याला आग लागून खाक झालेल्या डोंबिवली एमआयडीसीतील मेट्रोपॉलिटन एक्झिमकेम या कंपनीला उत्पादन बंद करण्याची नोटीस औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाने बुधवारी स्वतंत्रपणे नोटिसा बजावल्या आहेत. या नोटिसांद्वारे जोपर्यंत संपूर्ण सुरक्षा उपाययोजना करण्यात येत नाहीत, तोपर्यंत कंपनीने उत्पादनप्रक्रिया बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
कंपनीचा मालक आणि व्यवस्थापनास या नोटिसा बजावल्या आहेत. ‘मेट्रोपॉलिटन एक्झिमकेम’ या कारखान्यात डाइंग इंटरमिडिएट केमिकल्सचे उत्पादन करण्यात येते. कारखान्यातील गोदामातील रसायनाला मंगळवारी दुपारी १२.४५ वाजता लागली. ही आग रात्री १० वाजता आटोक्यात आली. बुधवारी सकाळी रसायनतज्ञ्जांच्या मदतीने कंपनीतील शिल्लक रसायनांची पाहणी करण्यात आली. जमिनीवरील ओलियम रसायनाची टाकी आणि जमिनीखाली असलेल्या ज्वालाग्राही रसायनांच्या टाकीची पाहणी करण्यात आली. कंपनीमध्ये अद्याप कोणालाच सोडलेले नाही, अशी माहिती औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य संचालनालयाचे सहसंचालक विनायक लोंढे यांनी दिली.
आगीमुळे कंपनीच्या इमारतीचा ढाचा धोकादायक झाला असून ती केव्हाही कोसळू शकते. कंपनीने सुरक्षेची उपाययोजना पूर्ण केल्याशिवाय उत्पादन प्रक्रिया सुरू करू नये, असे आदेश दिल्याचे लोंढे म्हणाले. आगीमागचे नेमके कारण सखोल चौकशीनंतर उघड होणार आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव ई. रवींद्रन म्हणाले की, प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे या कंपनीला उत्पादन बंदची नोटीस देण्यात आली आहे. जोपर्यंत सुरक्षिततेची उपाययोजना लागू केली जात नाही, तोपर्यंत कंपनीने उत्पादन करू नये, असे आदेश देण्यात आलेले आहेत. औद्योगिक विकास महामंडळाच्या डोंबिवली विभागाचे कार्यकारी अभियंता संजय ननावरे आगीसंदर्भात म्हणाले की, दुर्घटना झालेल्या कंपनीची आम्ही प्रत्यक्ष पाहणी केली आहे. त्यानुसार, प्रथमदर्शनी हा एक अपघात आहे.
डोंबिवलीतील ३११ कंपन्यांचे सर्वेक्षण पूर्ण
औद्योगिक विकास महामंडळ, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी अशा संयुक्तरीत्या कंपन्यांचे सर्वेक्षण
केले आहे. आतापर्यंत डोंबिवलीतील ३११ कंपन्यांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. त्याचा अहवाल लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सादर केला जाणार आहे. दुर्घटनाग्रस्त कंपनीने सेफ्टी आॅडिट केले होते, मात्र फायर आॅडिट केले होते की नाही, याविषयी माहिती नसल्याचे ननावरे यांनी सांगितले.