मुंबई - त्रिपुरा व उत्तर प्रदेशातील पुतळ्यांच्या तोडफोडीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व राष्टÑपुरुष व महत्त्वाच्या पुतळ्यांवरील सुरक्षाव्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. त्याबाबत विशेष खबरदारी बाळगण्याचे आदेश राज्याचे कायदा व सुव्यवस्था विभागाचे प्रमुख बिपीन बिहारी यांनी सर्व घटक प्रमुखांना दिले आहेत. राज्यात विविध ठिकाणी हजारोंवर पुतळे असून, त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी ती उभारणाºया संस्था, संघटनांवर आहे. मात्र, सध्याच्या परिस्थितीत या विषयावरून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे, त्यामुळे पोलिसांना त्याबाबत जागरूकता बाळगण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.त्रिपुरात रशियन राज्यक्रांतीचे प्रणेता व्लादिमीर लेनिन यांचा पुतळा तोडल्याचे प्रकरण ताजे असतानाच मंगळवारी रात्री तामिळनाडूत समाजसुधारक आणि द्रविड आंदोलनाचे संस्थापक ई. व्ही. रामासामी पेरियार यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली, तर बुधवारी उत्तर प्रदेशात मेरठ येथे काहींनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची मोडतोड करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्या ठिकाणी दोन गटांमध्ये वाद होऊन हिंसाचार भडकला आहे. त्याचे लोण राज्यातही पसरण्याची शक्यता असल्याने त्याबाबत विशेष खबरदारी घेण्याबाबत पोलीस आयुक्त/ अधीक्षकांना सूचना करण्यात आल्या आहेत. प्रत्येक पोलीस ठाण्याने आपल्या हद्दीतील राष्टÑपुरुष व प्रमुख व्यक्तींच्या पुतळ्यांची पाहणी करून त्यांच्या सुरक्षेबाबत योग्य बंदोबस्त नेमावा, अशा सूचना करण्यात आल्या आहेत.अफवेला बळी पडू नकाराज्यातील सर्व महत्त्वाच्या पुतळ्यांच्या सुरक्षिततेबाबत आवश्यक खबरदारी घेण्यात आली आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवेला बळी पडू नये. कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे.- बिपीन बिहारी (महासंचालक, कारागृह आणि कायदा व सुव्यवस्था)
राज्यातील पुतळ्यांच्या सुरक्षेत वाढ, तोडफोडीच्या पार्श्वभूमीवर विशेष खबरदारी घेण्याचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2018 5:44 AM