लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : वांद्रे येथील पापा पांचो दा ढाबामध्ये एका मांसाहारी थाळीत उंदराचे पिल्लू सापडल्याने खळबळ उडाली आहे. गेल्या २२ वर्षांपासून सुरू असलेल्या या जुन्या हॉटेलमध्ये असा प्रकार घडल्यानंतर याप्रकरणी तक्रारदारासह अन्य तांत्रिक तपासही केला जाणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली. त्यामुळे उंदीर जेवणात पडला की खोडसाळपणे टाकला गेला हे उघड होणार आहे.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मांसाहारी थाळीतील चिकनचे नमुने ताब्यात घेतले गेले आहेत. पुढील तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवले जाणार आहेत. अत्यंत संवेदनशील अशा या घटनेमुळे पोलिस कसून तपास करत आहेत. पोलिसांनी या घटनेनंतर मॅनेजर विवियन सिक्वेरा व मांस पुरवणाऱ्यासह स्वयंपाक बनविण्यावर गुन्हा दाखल केला. त्यानंतर दोघांना अटक करून जामिनावर सुटका करण्यात आली.
या प्रकरणामध्ये तक्रारदाराचीही चौकशी होईल वसीसीटीव्ही फुटेजची पडताळणी केली जाईल. आम्ही या घटनेचा दोन दिवस योग्य प्रकारे तपास केला आणि त्यानुसार गुन्हा दाखल करत संबंधितांना अटकही केली. याप्रकरणी आम्ही पुढील तपास करत असून त्यानुसार योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल, असे परिमंडळ ९ चे पोलिस उपायुक्त कृष्णकांत उपाध्याय यांनी सांगितले.
पैसे उकळण्यासाठी कृत्य – व्यवस्थापन
आमचे रेस्टॉरंट खूप जुने आहे आणि गेल्या २२ वर्षांत अशी कोणतीही घटना घडली नव्हती. राजस्थानचे दोन ग्राहक मद्यधुंद अवस्थेत आले होते. सर्व्हर त्यांना दारू देत नसल्यामुळे त्याने आक्षेप घेतला. आमच्या रेस्टॉरंटमधून पैसे उकळण्यासाठी हे जाणूनबुजून केले असावे, असा आरोप व्यवस्थापनाने केला आहे. आमचे स्वयंपाकी जे आहेत, त्यांच्यावर कोणतेही फौजदारी खटले नाहीत, असा दावा त्यांनी खंत व्यक्त करताना केला.
नेमकी घटना काय?
- फिर्यादी अनुराग दिलीप सिंग (४०) हे दिंडोशी परिसरातील रहिवासी असून ते गोरेगाव पश्चिम येथील एका खासगी बँकेत वरिष्ठ व्यवस्थापक म्हणून काम करतात.- ते १३ ऑगस्ट रोजी या हॉटेलमध्ये गेले होते. त्यावेळी जेवणासाठी त्यांच्यासोबत त्यांचा मित्र अमीन खान (४०) देखील होता. - वांद्रे येथे दिवसभर खरेदी केल्यानंतर रविवारी हॉटेलमध्ये जेवायला गेले. त्यावेळी ऑर्डर केलेल्या चिकन डिशमध्ये उंदराचे पिल्लू आढळले.
----००००----