Join us

मैत्रिणीसोबत दारू पार्टीसाठी ऑनलाइन मद्य मागविणे पडले महागात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 4:06 AM

तरुणीची ६० हजार रुपयांची फसवणूक; मलबार हिल पाेलिसांकडून तपास सुरूलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मैत्रिणीसोबत दारू पार्टीसाठी ऑनलाइन ...

तरुणीची ६० हजार रुपयांची फसवणूक; मलबार हिल पाेलिसांकडून तपास सुरू

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मैत्रिणीसोबत दारू पार्टीसाठी ऑनलाइन मद्य मागविणे इंटेरिअर डिझायनर असलेल्या तरुणीला महागात पडले. तरुणीची ६० हजार रुपयांना फसवणूक झाली असून, मलबार हिल पोलीस अधिक तपास करत आहेत.

गावदेवी परिसरातील रहिवासी असलेली २८ वर्षीय तरुणी १८ जूनला मैत्रिणीसोबत मलबार हिलमध्ये राहणाऱ्या अन्य मैत्रिणीला भेटण्यासाठी जात होती. याच दरम्यान या दाेघींपैकी एकीने गुगलवरुन ऑनलाइन मद्य विक्री करणाऱ्या वेबसाइटचा शोध घेतला. साईटवर मिळालेल्या क्रमांकावर कॉल करून मद्याची ऑर्डर दिली.

समोरून बोलणाऱ्या व्यक्तीने वाईनच्या ऑर्डरचे झालेले १ हजार ७२० रुपये बिल पाठविण्यासाठी तिला एक क्यूआर कोड पाठवला. तक्रारदार तरुणीने पेटीएम ॲपद्वारे क्यूआर कोड स्कॅन करत पैसे पाठवले. दोन तास उलटूनही ऑर्डर न मिळाल्याने तरुणीने संबंधित क्रमांकावर कॉल करून विचारणा केली. तसेच पैसे रिफंड करण्यास सांगितले.

दरम्यान, ऑर्डर रद्द करण्याच्या नावाखाली तिच्या खात्यातून ६० हजार रुपये काढण्यात आले. यात फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी मलबार हिल पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार, मलबार हिल पोलीस अधिक तपास करत आहेत.

.............................................................................