Join us

नवाब मलिक हाजीर हो! चांदीवाल आयोगाचे आदेश; सचिन वाझेवरील आरोपानं अडचणीत

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2022 7:25 AM

अँटिलिया बंगल्याजवळ स्फोटके सापडल्याचे प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचे तत्कालिन पोलीस आयुक्त परमबीर सिंग आणि बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे हे सूत्रधार होते, असे विधान मलिक यांनी केले होते.

 मुंबई : राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांना न्या. कैलास चांदीवाल आयोगाने नोटीस बजावली असून, त्यात त्यांना १७ फेब्रुवारी रोजी  हजर राहण्यास सांगितले आहे. 

नवाब मलिक यांनी केलेल्या एका विधानावरुन त्यांना आयोगाने ही नोटीस बजावली आहे. प्रख्यात उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया बंगल्याजवळ स्फोटके सापडल्याचे प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचे तत्कालिन पोलीस आयुक्त परमबीर सिंग आणि बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे हे सूत्रधार होते, असे विधान मलिक यांनी केल्याचा दावा वाझे यांचे वकील योगेश नायडू यांनी आयोगासमोर केला. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी असाच दावा आधी केला होता. त्याआधारे आपण विधान करीत असल्याचे नवाब मलिक म्हणाल्याचे नायडू यांनी आयोगास सांगितले. 

नवाब मलिक यांच्या या विधानाने वाझे यांची बदनामी झाली असून, त्यामुळे वाझे यांची प्रतिमा मलिन झाली असल्याचे नायडू यांनी आयोगासमोर सांगितले. या पार्श्वभूमीवर नवाब मलिक यांना आयोगाने नोटीस बजावली आहे.  या कथित विधानाबाबत मलिक हे १७ फेब्रुवारीला आयोगासमोर बाजू मांडतील.

टॅग्स :नवाब मलिकसचिन वाझे