४८ तासांत अतिक्रमण हटविण्याचे फॅशन स्ट्रीटवरील स्टॉलधारकांना आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2018 02:18 AM2018-04-10T02:18:31+5:302018-04-10T02:18:31+5:30
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चर्चगेट परिसरातील फॅशन स्ट्रीटवरील स्टॉलधारकांनी पदपथही सोडलेले नाहीत. त्यामुळे अतिक्रमण करणाऱ्या ३९६ स्टॉलधारकांना महापालिकेने नोटीस बजावली आहे.
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चर्चगेट परिसरातील फॅशन स्ट्रीटवरील स्टॉलधारकांनी पदपथही सोडलेले नाहीत. त्यामुळे अतिक्रमण करणाऱ्या ३९६ स्टॉलधारकांना महापालिकेने नोटीस बजावली आहे. पुढील ४८ तासांत अतिक्रमण न हटविल्यास त्यांचा परवाना रद्द करण्यात येईल, असा दमच पालिका प्रशासनाने गाळेधारकांना भरला आहे.
फॅशन स्ट्रीटवर ३९६ अधिकृत परवाना असलेले गाळेधारक आहेत. यातील अनेक गाळेधारकांनी पदपथही व्यापले आहेत, तर बेकायदा फेरीवाल्यांनीही येथील पदपथांवर आपली दुकाने थाटली आहेत. यामुळे पादचाºयांना चालण्यासाठी या ठिकाणी जागा उरलेली नाही. याबाबत अनेक तक्रारी आल्यानंतर पालिकेच्या ए विभागामार्फत सर्व गाळेधारकांना नोटीस पाठविण्यात आल्या आहेत.
फॅशन स्ट्रीटवर स्टॉलधारकांना ठरावीक जागा नेमून देण्यात आली आहे. मात्र, स्टॉलधारक आपले सामान पदपथावर मांडतात. काही स्टॉलधारकांनी पदपथावरच आपले दुकान थाटले आहे. अशा सर्वांना अतिक्रमण हटवून नेमून दिलेल्या जागेतच दुकान लावा, असे निर्देश देण्यात आल्याचे ए विभागाचे सहायक आयुक्त किरण दिघावकर यांनी दिले.
अतिक्रमण हटविण्याची वारंवार सूचना करूनही नियम धाब्यावर बसवून लोखंडी पाइप, लाकडी बांबू आणि ताडपत्रीच्या साहाय्याने स्टॉलधारकांनी बेकायदेशीरपणे
जागा व्यापल्याचे पालिकेच्या निदर्शनास आले आहे. या स्टॉलधारकांना नोटीस देऊन सुधारणा करण्याची संधी देण्यात आली
आहे. मात्र ही मुदत संपल्यानंतर पालिका अधिकारी त्या ठिकाणी अचानक धाड टाकून अतिक्रमण आढळल्यास कारवाईचा बडगाच उगारणार आहेत.
गेल्या वर्षी अतिक्रमण केलेल्या ५० गाळेधारकांना पालिकेने नोटीस पाठवल्या होत्या. यापैकी ३० जणांचे परवाने रद्द करण्यात आले होते. मात्र उच्च न्यायालयाने यावर स्थगिती दिली आहे. याचा गैरफायदा घेऊन पुन्हा अनेक गाळेधारकांनी पदपथावर अतिक्रमण केले आहे. त्यामुळे या स्टॉलधारकांना नोटीस धाडण्यात आली आहे.