लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : गणपती विसर्जनावेळी काही पोलीस खाकी वर्दीत नाचतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राज्य पोलीस महासंचालक कार्यालयातर्फे कोणत्याही पोलिसाने खाकी वर्दीत नाचू नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. गणवेशात नाचताना आढळल्यास कारवाई करण्याचे निर्देशही देण्यात आले असून, याबाबतचे आदेश लवकरच काढण्यात येणार आहेत.
कोरोनामुळे सण-उत्सवाला लागलेल्या ब्रेकनंतर यंदा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीदरम्यान कर्तव्यावर असलेल्या पोलिसांनाही नाचण्याचा मोह आवरला नाही. त्यांनी ठेका घेतला. तर काहींनी ढोल वाजवत आनंद लुटला. त्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. यापूर्वीही पंढरपूरच्या वारीमधीलही काही व्हिडिओ अशाच प्रकारे व्हायरल झाले होते. पोलीस मुख्यालयाने पोलीस अधीक्षक स्तरावरील अधिकाऱ्याला याबाबत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. याबाबतचा अहवाल पोलीस मुख्यालयाला सादर करण्यात आला असून, त्यानंतर वरील सूचना करण्यात आल्याचे समजते. तसेच या आठवड्याभरात खाकीत न नाचण्याचे आदेशही काढण्यात येणार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले आहे.