तुर्तास विद्यार्थ्यांना ऑनलाईनच शिक्षण, शासनाकडून मार्गदर्शक सूचनांचा अध्यादेश
By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2020 05:52 PM2020-07-23T17:52:49+5:302020-07-23T17:57:34+5:30
राज्य शिक्षण विभागाकडून 15 जूनपासून यंदाचे शैक्षणिक वर्ष सुरू करण्यात येत असल्याचे जाहीर करुन ऑनलाईन शिक्षण देण्यासंदर्भात अध्यादेश जारी करण्यात आला आहे
मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळा सुरु करण्याबाबत सध्यातरी कुठलाही विचार राज्य सरकारचा नसल्याचे दिसून येत आहे. कारण, विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन शिक्षण वर्गासाठी शिक्षण विभागाकडून काही मागर्दर्शन सूचना जारी करण्यात आल्या आहेत. त्यााबाबतचा अध्यादेशच शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे. इयत्ता 1 ली ते बारावीच्या विद्यार्थ्यांना सध्यातरी ऑनलाईन शिक्षण देण्यात येणार आहे. त्यासाठी, वेळेची मर्यादा आणि शिक्षणाचे स्वरुप जाहीर करण्यात आले आहे.
राज्य शिक्षण विभागाकडून 15 जूनपासून यंदाचे शैक्षणिक वर्ष सुरू करण्यात येत असल्याचे जाहीर करुन ऑनलाईन शिक्षण देण्यासंदर्भात अध्यादेश जारी करण्यात आला आहे. त्यानुसार, 1 ली ते 12 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणासाठी तारखाही जाहीर करुन देण्यात आल्या आहेत. आता, या विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन शिक्षणासाठी काही मार्गदर्शक सूचना शिक्षण विभागाने देऊ केल्या आहेत. त्याचा, अध्यादेशही 22 जुलै रोजी काढण्यात आला आहे. त्यानुसार, पूर्व प्राथमिक विद्यार्थ्यांसाठी सोमवार ते शुक्रवार दररोज 30 मिनिटे ऑनलाईन क्लास घेण्यात येईल. त्यामध्ये, पालकांशी संवाद व त्यांना मार्गदर्शन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
ऑनलाईन शिक्षणासाठी राज्यातील शाळांसाठी मार्गदर्शक सूचनांचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला. विद्यार्थी हित व आरोग्य लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात येत आहे. #OnlineClasses@CMOMaharashtra@scertmahapic.twitter.com/6lQbVefXLG
— Varsha Gaikwad (@VarshaEGaikwad) July 23, 2020
इयत्ता 1 ली ते दुसरीच्या विद्यार्थ्यांना सोमवार ते शुक्रवार दररोज 30 मिनिटांची 2 सत्रे आहेत. त्यामध्ये पालकांशी संवाद आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावयाचे आहे. 3 री ते 8 वीच्या विद्यार्थ्यांसाठी सोमवार ते शुक्रवार दररोज 45 मिनिटांची 2 सत्रे घेण्यात येणार आहेत. त्यामध्ये केवळ विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण द्यावयाचे आहे. तसेच, 9 वी ते 12 वीच्या विद्यार्थ्यांनाही 45 मिनिटांची 2 सत्रे देण्यात आली असून विद्यार्थ्याना, शिक्षकांनी ऑनलाईन मार्गदर्शन करावयाचे आहे. याप्रकरणी राज्य सरकारचे उपसचिव राजेंद्र पवार यांच्या स्वाक्षरीने अध्यादेश जारी करण्यात आला आहे.
दरम्यान, इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना सर्व विषयांचे मराठी माध्यमातील शिक्षण दूरदर्शनच्या ‘सह्याद्री’ वाहिनीवरून २० जुलैपासून दैनंदिन मालिकेद्वारे दिले जाणार आहे. इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठीसुद्धा शासनाकडून लवकरच निर्णय घेतला जाणार आहे. राज्यातील सर्व विद्यार्थ्यांनी या मालिकेचा लाभ घ्यावा, असे आवाहन राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केले.
२० जुलै ते २६ सप्टेंबर २०२० या काळातील इयत्तानिहाय दैनंदिन वेळापत्रक (रविवार वगळून)
वेळ इयत्ता
स. ७.३० ते ८.०० आठवी
स. ८.०० ते ८.३० सातवी
स. ८.३० ते ९.०० अन्य कार्यक्रम
स. ९.०० ते ९.३० सहावी
स. ९.३० ते १०.०० पाचवी
स. १० ते १०.३० चौथी
स. १०.३० ते ११ तिसरी
स. ११ ते ११.३० अन्य कार्यक्रम
स.११.३० ते दु. १२ दुसरी
दु. १२ ते १२.३० पहिली