राम मंदिरासाठी अध्यादेश काढावा - संजय राऊत
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2018 03:04 AM2018-11-24T03:04:47+5:302018-11-24T03:05:11+5:30
अयोध्या येथील राम मंदिराचा वाद जुना आहे. या जागेवर मंदिर उभारण्यासाठी केंद्र सरकारने अध्यादेश काढावा. राष्ट्रपती भवनापासून उत्तर प्रदेशपर्यंत भाजपाचेच सरकार आहे.
मुंबई : अयोध्या येथील राम मंदिराचा वाद जुना आहे. या जागेवर मंदिर उभारण्यासाठी केंद्र सरकारने अध्यादेश काढावा. राष्ट्रपती भवनापासून उत्तर प्रदेशपर्यंत भाजपाचेच सरकार आहे. तरीही अध्यादेश येण्यास एवढा वेळ का लागत आहे, असा प्रश्न शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यामुळे मंदिराचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. अशात जो खासदार राम मंदिराला विरोध करेल त्याचे देशात फिरणे कठीण होईल, असा इशाराही राऊत यांनी दिला आहे.
शिवसेनेच्या अयोध्यावारीच्या पार्श्वभूमीवर बोलताना राऊत म्हणाले की, आम्ही त्या वेळी १७ मिनिटांत बाबरी मशीद पाडली होती. आता या मंदिरासंबंधी अध्यादेश आणण्यासाठी इतका वेळ का लागत आहे? राज्यसभेत असे अनेक खासदार आहेत ज्यांना राम मंदिर हवे आहे आणि त्यासाठीचा अध्यादेशही हवा आहे. जो खासदार विरोध दर्शवेल त्याचे देशात फिरणे कठीण होईल, असे राऊत म्हणाले.
दरम्यान, राम मंदिराच्या मुद्द्यावरून आक्रमक झालेल्या विश्व हिंदू परिषदेसह इतर हिंदू संघटना, अयोध्येत दाखल झालेले शिवसेनेचे हजारो कार्यकर्ते या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अयोध्येत कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. अयोध्येतील व्यापाºयांनी मात्र विश्व हिंदू परिषदेच्या धर्मसभेला विरोध दर्शविला असून उद्धव ठाकरे यांनाही काळे झेंडे दाखवण्याचा निर्णय घेतला आहे. संयुक्त व्यापार मंडळाचे अध्यक्ष जनार्दन पाण्डेय म्हणाले की, फैजाबाद किंवा अयोध्येतील शांतता भंग करण्याचा या सगळ्यांचा प्रयत्न आहे. आगामी काळात येथील वातावरण तणावपूर्ण राहील या शक्यतेने दोन्ही शहरांतील लोक चिंतित आहेत. त्यामुळे हिंदू-मुस्लीम कुटुंबांनी अन्नधान्याचा आतापासूनच साठा करण्यास सुरुवात केली आहे.