शेअर मार्केटचा नफा करतोय सामान्यांचा खिसा रिकामा, कोट्यधीश होण्याच्या स्वप्नात...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2023 10:03 AM2023-05-02T10:03:34+5:302023-05-02T10:04:06+5:30
पैशांच्या वाढत्या मागणीमुळे त्यांनी आणखी पैसे देण्यास नकार देताच त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली
मुंबई - तुम्हालाही शेअर मार्केट गुंतवणुकीचा कॉल येत असल्यास वेळीच सावधान. गेल्या काही दिवसांत अशाच प्रकारे शेअर ट्रेडिंग, स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली गंडविणाऱ्या मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशच्या टोळ्या कार्यरत असल्याचे सायबर पोलिसांच्या कारवाईतून उघड झाले आहे. अनेकांना लक्षाधीश, कोट्यधीश होण्याची स्वप्ने दाखवून त्यांच्यावर रस्त्यावर येण्याची वेळ ओढवली आहे.
मुंबईतील एका व्यक्तीला अनुज अग्रवाल व आर. के. पाठक यांच्या नावाने एप्रिल २०२१ ते १६ मार्च २०२३ दरम्यान संपर्क करून ए. के. फायनान्शियल शेअर ट्रेडिंग ग्रुपमधून बोलत असल्याचे भासविले. संबंधित कंपनीच्या नावाने बनावट व खोटी कागदपत्रे पाठवून त्यांचा विश्वास संपादन केला. सावज जाळ्यात अडकल्याचे लक्षात येताच, शेअर ट्रेडिंग व गोल्ड लॉट्समध्ये गुंतवणूक करण्यास भाग पाडले. पुढे, पैसे गुंतविलेल्या शेअरमध्ये नफा होत असल्याचे सांगून, बनावट माहितीचे स्क्रीनशॉट पाठविले. पुढे हीच रक्कम काढण्यासाठी टॅक्स, डिफरन्स, लॉस अशा प्रकारची विविध कारणे देत पैसे उकळण्यास सुरुवात केली.
पैशांच्या वाढत्या मागणीमुळे त्यांनी आणखी पैसे देण्यास नकार देताच त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. घरी रिकव्हरीसाठी माणसे पाठवित कुटुंबीयांनाही हानी पोहोचविण्याची धमकी दिली. पुढे अशाच प्रकारे वेगवेगळी कारणे देत, त्यांची एकूण ३१ लाख रुपयांना फसवणूक केली. अखेर तक्रारदारांनी पोलिसांत धाव घेतली. सायबर पोलिस पथकाने तांत्रिक पुराव्याच्या मदतीने शोध सुरू केला. तेव्हा आरोपी हे इंदोर, लाडपूर, माहोबा (उत्तर प्रदेश) येथे असल्याचे कळले. त्यानुसार, वेगवेगळी पथके तयार करत कल्याणसिंग करणसिंग उर्फ विशाल (३९), अनुज रामनारायण भगोरिया (३०), भीमसिंग गोवर्धन मीना (२८) या तिघांविरुद्ध गुन्हा नोंदवित अधिक तपास करत आहेत. अटक आरोपी पाठक आणि अग्रवाल नावाने कंपनीचा बॉस म्हणून संपर्क करायचे.
काय करावे?
सोशल मीडिया किंवा कोणत्याही जाहिरातीद्वारे शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करून नफा मिळवूून देणारी व्यक्ती किंवा संस्था या कायदेशीर आहेत का? याची पडताळणी करूनच शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करावी. सर्च इंजिनवर शेअर मार्केटबाबत माहिती घेताना अधिकृत खात्रीदायक माहिती देणाऱ्या वेबसाइटला भेट द्या. शेअर मार्केट ॲप्लिकेशन इन्स्टॉल करताना ते बनावट नसल्याची खात्री करूनच इन्स्टॉल करावे.
असे चालायचे रॅकेट....
सर्व स्तरातील नागरिकांना शेअर मार्केट- स्टॉक ट्रेडिंगमध्ये जास्तीत जास्त नफा मिळविण्याचे आमिष दिले जाते व लोकांचे पैसे डीमॅट खात्यावर ट्रान्स्फर न करता ते स्वत:च्या फायद्यासाठी विविध बँक खात्यांवर ट्रान्स्फर करून घेतले जातात. पुढे, गुंतवणुकीवर स्टॉकमध्ये खूप जास्त नफा होत असल्याचे खोटे स्क्रीनशॉट पाठवून लोकांचा विश्वास संपादन केला जातो. नफा रक्कम काढण्यासाठी टॅक्स, डिफरन्स, लॉस अशी रक्कम भरण्याच्या नावाखाली नागरिकांना आणखी रक्कम भरण्यास भाग पाडले जाते. पैसे न भरल्यास घरी एजंट पाठवून धमकावून पैसे उकळतात.
येथे करा तक्रार...
अशा प्रकारे कोणाचीही फसवणूक झाल्यास त्याची माहिती तत्काळ प्रादेशिक सायबर पोलिस ठाण्यात करावी. तसेच, सायबर पोलिसांच्या १९३० या हेल्पलाइनवर किंवा https://cybercrime.gov.in या संकेतस्थळावर तक्रार नोंदवावी, असे आवाहन पोलिस उपायुक्त डॉ. बाळसिंग राजपूत यांनी केले आहे.