अवयवदानाची मोहीम व्यापक व्हायला हवी - प्रकाश संघवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 05:07 AM2018-03-19T05:07:53+5:302018-03-19T05:07:53+5:30

अवयवदान हेच सर्वश्रेष्ठ दान आहे. त्यामुळे महावीर इंटरनॅशनलने (मुंबई) सुरू केलेल्या मोहिमेला आपण भविष्यात चळवळीचे स्वरूप द्यायचे आहे.

Organ campaign should be comprehensive - Prakash Sanghvi | अवयवदानाची मोहीम व्यापक व्हायला हवी - प्रकाश संघवी

अवयवदानाची मोहीम व्यापक व्हायला हवी - प्रकाश संघवी

Next

मुंबई : अवयवदान हेच सर्वश्रेष्ठ दान आहे. त्यामुळे महावीर इंटरनॅशनलने (मुंबई) सुरू केलेल्या मोहिमेला आपण भविष्यात चळवळीचे स्वरूप द्यायचे आहे. आयुष्यभर आपण अवयवरूपी जगतो. मात्र, आपले अवयव मरणानंतर कोणाच्या तरी रूपाने जिवंत राहतात, ही माणुसकीची सर्वांत मोठी भेट आहे. आपल्या संस्थेने गेल्या २० दिवसांत सुरू केलेल्या या मोहिमेच्या माध्यमातून १ हजार ६५० व्यक्तींनी अवयवदानाची प्रतिज्ञा घेतली आहे. त्यामुळे या मोहिमेत सहभागी होण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन प्रमुख अतिथी प्रकाश संघवी यांनी केले.
महावीर इंटरनॅशनल ट्रस्टच्या माध्यमातून रविवारी सायंकाळी मरिन लाइन्स येथील बिर्ला मातोश्री सभागृहात ‘डोनेट आॅर्गन्स-सेव्ह लाइफ’ हा कार्यक्रम झाला. अवयवदानाच्या मोहिमेसाठी पाठिंबा आणि निधी देणाऱ्या संस्थेच्या सदस्यांचा स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. संस्थेचे संस्थापक सदस्य आमदार मंगलप्रभात लोढा, आ. राज पुरोहित, संस्थेचे धीरज कोठारी, मुंबई विभाग अध्यक्ष सतीश सुराणा, प्राप्तीकर आयुक्त अजित जैन, वरिष्ठ पोलीस अधिकारी सुनील जैन आदी उपस्थित होते. किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वी झालेल्या रुग्णाने आपला सकारात्मक आणि प्रेरणादायी अनुभवही कथन केला. संस्थेचे अध्यक्ष अशोक मेहता यांनी सांगितले की, ट्रस्टच्या माध्यमातून अवयवदानाची हाती घेतलेली मोहीम समाजाच्या तळागाळात पोहोचवायची आहे. पर्यावरण रक्षण, कर्करोगविषयक जनजागृतीवरही कार्य करायचे आहे.
बॉम्बे रुग्णालयाचे डॉ. अमित मंडोट यांनी अवयवदानाचे महत्त्व पटवून दिले. कोणते अवयव व ते कोणत्या स्थितीत दान करता येतात, कुटुंबीयांची भूमिका, अवयवदान केल्यामुळे रुग्णाची स्थिती कशी बदलते, देश-राज्यातील अवयवदानाचे प्रमाण आदींची त्यांनी सविस्तर माहिती दिली. विशेष म्हणजे,अमेरिका आणि स्पेनच्या तुलनेत देशातील अवयवदानाचे प्रमाण अत्यल्प असल्याचे अधोरेखित केले. मोहिमेला मार्गदर्शन व सहकार्य करणाºया सर्व डॉक्टरांचाही स्मृतिचिन्ह प्रदान करून सन्मान करण्यात आला. ट्रस्टचे संस्थापक सदस्य विजय सिंग बापना म्हणाले की, वर्षभरात पाच हजार व्यक्तींनी अवयवदानाचा निश्चय करावा, असे लक्ष्य आहे. महावीर इंटरनॅशनल ट्रस्टच्या ‘डोनेट आॅर्गन्स-सेव्ह लाइफ’ कार्यक्रमात प्रमुख अतिथी प्रकाश संघवी यांना स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी, ट्रस्टचे मुंबई झोनचे अध्यक्ष सतीश सुराना, ट्रस्टचे संस्थापक सदस्य विजय सिंग बापना संघवी यांचे तीन बंधू, ट्रस्टचे अध्यक्ष अशोक मेहता आणि आमदार मंगलप्रभात लोढा उपस्थित होते.

Web Title: Organ campaign should be comprehensive - Prakash Sanghvi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.