Organ Donation: हॉस्पिटलमधून ‘अलर्ट कॉल’ येतो, पण यकृतच मिळत नाही..! राज्यात आजमितीला १,३३१ रुग्ण यकृताच्या प्रतीक्षेत
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2022 12:47 PM2022-06-22T12:47:35+5:302022-06-22T12:48:11+5:30
Organ Donation: रुग्णालयातून अलर्ट कॉल आला की धाकधूक होत असल्याचे, रोडा इच्छापोरीया (७०) यांचे पती पर्सी इच्छापोरीया (७१) यांनी ‘लोकमत’ला सांगितले. राज्यात आजमितीला १,३३१ रुग्ण यकृताच्या प्रतीक्षेत आहेत.
- संतोष आंधळे
मुंबई : आतापर्यंत सहा वेळा रुग्णालयातून ‘अलर्ट कॉल’ आला होता, तुम्ही तत्काळ दाखल व्हा, तुम्हाला यकृत मिळाले आहे. हे कॉल मध्यरात्री यायचे. मग, सगळ्या गोष्टी बाजूला सारून मी माझ्या बायकोला घेऊन उपचार सुरू असलेल्या रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात घेऊन जायचो. ५-६ तास तेथे काढल्यानंतर सांगण्यात यायचे की, तुम्हाला मिळणारे यकृत हे दुसऱ्या व्यक्तीला वापरण्यात आले आहे. कालांतराने लक्षात आले की, आमच्या आधी यकृताच्या प्रतीक्षा यादीत नाव असणाऱ्या रुग्णांसोबत आम्हालाही पर्यायी व्यवस्था म्हणून बोलाविले जात आहे, जर आमच्या आधीचा रुग्ण काही कारणास्तव शस्त्रक्रियेसाठी पात्र ठरला नाही तर आम्हाला ते यकृत मिळणार होते, परंतु प्रत्येक वेळी आमच्या पदरी निराशा आली. त्यामुळे रुग्णालयातून अलर्ट कॉल आला की धाकधूक होत असल्याचे, रोडा इच्छापोरीया (७०) यांचे पती पर्सी इच्छापोरीया (७१) यांनी ‘लोकमत’ला सांगितले. राज्यात आजमितीला १,३३१ रुग्ण यकृताच्या प्रतीक्षेत आहेत.
अंधेरी परिसरात पारसी वसाहतीत राहणाऱ्या रोडा यांना मे २०२१ मध्ये यकृत निकामी असल्याचे निदान केले गेले. त्याअगोदर २०१५ जुलैला त्यांना स्तनाच्या कर्करोगाचे निदान झाले होते. त्यातून त्या बऱ्या होऊन बाहेर पडल्या. त्यानंतर शरीरात कुठे कॅन्सरच्या पेशी अजून कुठे आहेत की नाहीत हे पाहण्यासाठी ‘पेट स्कॅन’ करण्यात आले. त्यामध्ये त्यांना कॅन्सर नाही, मात्र यकृत (लिव्हर सिरॉसिस) खराब होत असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर त्यांना यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया हा एकमेव पर्याय असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
यासाठी जातो अलर्ट कॉल
यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रियेपूर्वीपर्यंत रुग्णाला अन्य कोणताही आजार होऊ नये यासाठी आमचा डॉक्टरांचा समूह हा उपचार करत असतो. ‘अलर्ट कॉल’ हा आमच्या कामाच्या पद्धतीचा भाग आहे. मेंदूमृत व्यक्तीकडून यकृत अवयव मिळाल्यानंतर आम्ही प्रतीक्षा यादीवरील २-३ रुग्णांना अतिदक्षता विभागात येऊन थांबण्यास सांगतो. कारण पहिला रुग्ण काही वैद्यकीय कारणास्तव अवयव घेऊ शकला नाही तर तो अवयव घेणारा रुग्ण तत्काळ उपलब्ध असावा.
- डॉ. रवी मोहनका, यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया विभागाचे संचालक, एच एन रिलायन्स फाउंडेशन रुग्णालय