Organ Donation:त्याला दररोज सहा सुया टोचून घ्याव्या लागतात! राज्यात ६४ रुग्णांना हवे आहे स्वादुपिंड

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2022 11:38 AM2022-06-24T11:38:38+5:302022-06-24T11:39:04+5:30

Organ Donation: मला कधी स्वप्नातही वाटले नव्हते की एक दिवस संपूर्ण स्वादुपिंड (पॅनक्रिया) निकामी होऊन त्याचे प्रत्यारोपण करावे लागेल. या आजारामुळे, दिवसातून कमीत कमी सहा वेळा सुयांचा सामना शरीराला करावा लागतो.

Organ Donation: He has to inject six needles every day! In the state, 64 patients need pancreas | Organ Donation:त्याला दररोज सहा सुया टोचून घ्याव्या लागतात! राज्यात ६४ रुग्णांना हवे आहे स्वादुपिंड

Organ Donation:त्याला दररोज सहा सुया टोचून घ्याव्या लागतात! राज्यात ६४ रुग्णांना हवे आहे स्वादुपिंड

googlenewsNext

-संतोष आंधळे
 मुंबई : मला कधी स्वप्नातही वाटले नव्हते की एक दिवस संपूर्ण स्वादुपिंड (पॅनक्रिया) निकामी होऊन त्याचे प्रत्यारोपण करावे लागेल. या आजारामुळे, दिवसातून कमीत कमी सहा वेळा सुयांचा सामना शरीराला करावा लागतो. तीन वेळा इन्शुलिन इंजेक्शन पोटात किंवा पायात घेताना आणि साखर नियंत्रित आहे की नाही हे पाहण्यासाठी पुन्हा तीन वेळा सुईच्या माध्यमातूनच बोटावर टोचून साखर चेक केली जाते. त्या असह्य वाटणाऱ्या वेदना आता दैनंदिन कार्यशैलीचा भाग बनल्या आहेत, अशी कैफियत मांडतोय अहमदनगरचा ३० वर्षीय तरुण दीक्षेश शाह. गेली सहा वर्षे तो स्वादुपिंड हा अवयव मिळावा म्हणून चातकाप्रमाणे वाट पाहतोय. राज्यात आजमितीला ६४  रुग्ण स्वादुपिंडाच्या प्रतीक्षेत आहेत.

अहमदनगरच्या दीक्षेशने, पुणे येथील खासगी शिक्षण संस्थेतून फिल्म मेकिंग आणि एडिटिंग विषयाचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. मात्र या आजारपणामुळे त्याच्या स्वप्नांना अडसर निर्माण झाला. आजारामुळे त्याला बाहेर फिरून काम करणे शक्य होत नाही. नोकरीसाठी अनेकदा प्रयत्न केले, मात्र तेथेही या आजारामुळे त्याच्या पदरी निराशाच आली. दीक्षेशने सहा वर्षांपूर्वी पुणे येथील दीनानाथ मंगेशकर रुग्णांलयामार्फत स्वादुपिंड प्रतीक्षा यादीवर नाव नोंदणी केली आहे. त्याच्या या स्वादुपिंड आजाराचा त्याच्या किडनीवर परिणाम झाला असून किडनी निकामी झाली आहे. आता तो आठवड्यातून तीन वेळा डायलेसिस करत आहे. मात्र जोपर्यंत स्वादुपिंड अवयव मिळणार नाही तोपर्यंत त्याला अशाच पद्धतीने दुखरे जीवन व्यथित करावे लागणार आहे.

आता किडनी रोपणाची आवश्यकता
दीक्षेशला स्वादुपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रियेची गरज असून त्याला स्वादुपिंड मिळाल्यास त्याची तब्येत पूर्ववत होऊ शकते आणि तो सर्वसामान्यांसारखे आयुष्य जगू शकतो. स्वादुपिंड निकामी झाल्यामुळे त्याचा परिणाम थेट किडनीवर झाला असून त्याला आता किडनी रोपणाची आवश्यकता भासणार आहे. 
- डॉ. वृषाली पाटील, दीनानाथ मंगेशकर रुग्णालय, पुणे

लहान आतड्यांसाठीही राज्यात आठ जण प्रतीक्षेत
हा प्रकार लहान आतड्यांच्या बाबतीत आहे. सध्या नाशिकच्या संजय पवार यांचे लहान आतडे निकामी झाले असून त्यांना हा अवयव मिळावा म्हणून लहान आतड्यांच्या प्रतीक्षा यादीमध्ये त्यांनी आपले नाव नोंदविले असून ते २ महिने प्रतीक्षेत आहेत. दोन महिन्यात त्यांचे तब्बल १५ किलो वजन कमी झाले आहे.  राज्यात ८ रुग्ण लहान आतड्यांच्या प्रतीक्षेत आहेत. नाशिक येथे वास्तव्यास असणारे पवार मुंबईच्या परळ येथील ग्लोबल रुग्णालयात उपचार घेत आहेत. 
दोन महिन्यांपूर्वी त्यांचा पोटदुखीचा त्रास थांबत नसल्यामुळे ते या रुग्णालयात उपचार घेण्यास आले. त्यावेळी लहान आतड्याला रक्तपुरवठा होत नसल्यामुळे, हे आतडे खराब झाले असल्यामुळे त्यांच्यावर शस्त्रक्रिया करून लहान आतडे काढले गेले.  त्यामुळे त्यांना आता लहान आतडे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करणे गरजेचे आहे, असे त्यांच्या डॉक्टरांनी सांगितले.  
लहान आतडे प्रत्यारोपण होईपर्यंत त्यांना कृत्रिमरीत्या पोषकतत्त्वे दिली जात आहेत. राज्यात अशा पद्धतीच्या लहान आतडे प्रत्यारोपणाच्या आठ शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत, असे ग्लोबल रुग्णालयातील अवयव प्रत्यारोपण विभागाचे संचालक डॉ. गौरव चौबळ यांनी सांगितले.
(रुग्णांचे, नातेवाइकाचे  नाव आणि स्थळ बदलण्यात आले आहे.)

Web Title: Organ Donation: He has to inject six needles every day! In the state, 64 patients need pancreas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.