मुंबई : मुंबईच्या सुरेश पांचाल (४६) यांच्या अवयवदानामुळे चौघांना नवसंजीवनी मिळाली आहे. १२ आॅगस्ट रोजी पांचाल यांना डोक्यात कळा येत असल्याने मालाड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथून सिटी स्कॅनचा अहवाल आल्यानंतर ब्रेन स्ट्रोकचे निदान करण्यात आले. या निदानानंतर विलेपार्ले येथील खासगी रुग्णालयात पांचाल यांना हलविण्यात आले, मात्र बुधवारी सकाळी त्यांना ब्रेनडेड घोषित करण्यात आल्यानंतर कुटुंबियांनी अवयवदानाचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे चौघांना नवसंजीवनी मिळाली झाली आहे.पांचाल यांच्या कुटुंबियांचे डॉक्टरांनी समुपदेशन केल्यानंतर एक मूत्रपिंड ४५ वर्षीय महिलेला, दुसरे मूत्रपिंड मुलूंड येथील रुग्णालयाला पाठविण्यात आले. तर ५६ वर्षीय पुरुष रुग्णाला एक यकृत दान करण्यात आले, तर पांचाल यांचे हृदय बुधवारी स्वातंत्र्यदिनी चेन्नई येथील एका रुग्णाला पाठविण्यात आले.पांचाल यांचा मुलगा हृतिक याने याविषयी सांगितले की, वडिलांना अवयवदान करण्याची इच्छा होती. मात्र, अचानक ओढावलेल्या दु:खामुळे कुटुंबिय शोकाकुल झाले होते. वडिलांची अखेरची इच्छा पूर्ण करण्यासाठी अवयवदानाचा निर्णय घेतला आहे.याविषयी डॉ. राजन शहा यांनी सांगितले की, अवयवदानाविषयी जनजागृती होऊनही ब्रेनडेड रुग्णांचे अवयवदानाचे प्रमाण अजूनही कमी आहे. त्यामुळे प्रत्येकाने पुढाकार घेऊन याविषयी कृतीशील पाऊल उचलले पाहिजे.
अवयवदानामुळे चौघांना नवसंजीवनी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2018 3:28 AM