५७ वर्षीय व्यक्तीचे अवयवदान, तीन जणांना नवसंजीवनी
By स्नेहा मोरे | Updated: January 29, 2024 18:00 IST2024-01-29T18:00:07+5:302024-01-29T18:00:36+5:30
काही दिवसांपूर्वी डॉ. बाळाभाई नानावटी मॅक्स रुग्णालयात प्रकृती अस्वास्थ्याच्या तक्रारीसाठी ५७ वर्षीय व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

५७ वर्षीय व्यक्तीचे अवयवदान, तीन जणांना नवसंजीवनी
मुंबई - मुंबईत नव्या वर्षाच्या पहिल्याच महिन्यात आतापर्यंत चार अवयवदानांची नोंद झाली आहे. मुंबईत ५७ वर्षीय व्यक्तीच्या अवयवदानामुळे तीन जणांना नवसंजीवनी मिळाल्याची माहिती मुंबई जिल्हे अवयव प्रत्यारोपण समितीने दिली आहे.
काही दिवसांपूर्वी डॉ. बाळाभाई नानावटी मॅक्स रुग्णालयात प्रकृती अस्वास्थ्याच्या तक्रारीसाठी ५७ वर्षीय व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान डॉक्टरांनी या रुग्णाला मेंदू मृत घोषित केले. त्यानंतर नातेवाईक आणि कुटुंबियांचे अवयवदानासाठी समुपदेशन करण्यात आली. या समुपदेशनांती, कुटुंबियांनी रुग्णाचे अवयवदान करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, या व्यक्तीचे यकृत, दोन मूत्रपिंड या अवयवांचे दान केल्याने तीन जणांना जीवनदान मिळाले आहे. तर याखेरीज, कॉर्निया, त्वचा, हाडांचे देखील दान करण्यात आल्याची माहिती मुंबई जिल्हे अवयव प्रत्यारोपण समितीने दिली आहे.
मागील काही वर्षांपासून सातत्याने शासकीय आणि अशासकीय पातळीवर अवयवदानाबाबत जनजागृती व्हावी यासाठी विविध पातळ्यांवर विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. तसेच, याविषयीचे गैरसमज दूर करण्यासाठीही विविध कार्यक्रम हाती घेण्यात आले आहेत. मागील वर्षी एकूण ५० अवयवदानाची नोंद झाली, त्यात ७८ टक्के पुरुष तर २२ टक्के महिलांचे प्रमाण होते.