Join us  

चिमुकल्याच्या अवयवदानाने चौघांना जीवनदान, वाडिया रुग्णालयात होता दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2023 6:22 AM

अवघ्या तीन वर्षांचा चिमुकला मेंदूमृत घोषित, पालकांचा निर्णय प्रेरणादायी

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: सोसायटीच्या आवारात खेळताना बाइक अंगावर पडून जबर जखमी झालेल्या अवघ्या तीन वर्षांच्या चिमुकल्याला मेंदूमृत घोषित करण्यात आले. त्यानंतर पालकांनी त्याच्या अवयवदानाचा निर्णय घेतला. त्यातून दोन किडन्या, यकृत आणि हृदय दान केले गेले. या अवयवदानामुळे चौघांचे प्राण वाचले आहेत. मुंबईतील हे यंदाचे २०वे अवयवदान आहे.

डोंबिवली येथील एका सोसायटीत ५ जून रोजी आपल्या मोठ्या भावासोबत खेळत असताना तीन वर्षांच्या चिमुकल्याच्या अंगावर बाइक पडली. त्यात त्याच्या डोक्याला जबर मार बसला. स्थानिक रुग्णालयाने पुढील उपचारासाठी मुलाला परळ येथील वाडिया रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. तिथे त्याच्या मेंदूवर शस्त्रक्रिया झाली. परंतु तरीही प्रकृती चिंताजनक होती. अखेरीस रुग्णालयाने ९ जून रोजी मुलास मेंदूमृत घोषित केले. मुलाचे वडील नोकरदार आहेत तर आई गृहिणी आहे. मेंदूमृत जाहीर झाल्यानंतर त्याच्या अवयवांचे दान करण्याचा निर्णय पालकांनी घेतला. मुलाची एक किडनी जसलोक तर दुसरी ग्लोबल रुग्णालयातील रुग्णावर प्रत्यारोपित करण्यात आली. तर यकृत हिरानंदानीतील रुग्णाला देण्यात आले. हृदय चेन्नई येथील एका रुग्णालयातील रुग्णाला देण्यात आले.

पालकांचा निर्णय प्रेरणादायी आहे. गेल्या दोन वर्षांत इतर राज्यांच्या तुलनेत आपल्याकडे अवयवदानाचे प्रमाण कमी आहे. यानाबाबत मोठी जनजागृती गरजेची आहे. - डॉ. मिनी बोधनवाला, सीईओ, वाडिया रुग्णालय

 चिमुकल्यांत मेंदूमृत होण्याचे प्रमाण कमी असते. अशावेळी कुणीही पालक अवयवदानाच्या मन:स्थितीत नसतात. या मुलाच्या पालकांनी घेतलेल्या निर्णयामुळे चौघांचे प्राण वाचले. - डॉ. भरत शाह, सरचिटणीस, प्रत्यारोपण समन्वय समिती

टॅग्स :अवयव दान