Join us

अवयवदान प्रक्रिया लवकरच डिजिटलाइज; राज्यात प्रथमच, आरोग्य विभाग विकसित करणार ॲप

By संतोष आंधळे | Published: March 03, 2024 10:10 AM

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, या विषयावर सध्या काम सुरू आहे. ॲप विकसित करण्यासाठी खासगी संस्थेची मदत घेण्यात येत आहे.

मुंबई : अवयवदानाचे महत्त्व लोकांना पटावे यासाठी गेल्या कैक वर्षांपासून सर्व स्तरावर प्रसार, प्रचार सुरू आहे. या प्रयत्नांना आता यश येऊ लागले असून अवयवदानासाठी अनेक जण स्वेच्छेने पुढे येऊ लागले आहेत. परिणामी अवयवदान मोहिमेत सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या पाच राज्यांत महाराष्ट्राचा क्रमांक लागला आहे. आता एक पाऊल पुढे जात अवयवदानाची प्रक्रिया डिजिटलाइज करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी लवकरच सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे महाअवयवदान ॲप विकसित केले जाणार आहे. 

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, या विषयावर सध्या काम सुरू आहे. ॲप विकसित करण्यासाठी खासगी संस्थेची मदत घेण्यात येत आहे. सर्व संबंधित संस्थांना यामध्ये समाविष्ट करून घेण्यात आले आहे. सर्वांच्या सूचनांचा वापर हे ॲप विकसित करण्यासाठी होत आहे. यामुळे अवयवदान प्रक्रिया सुरळीत होण्यास मदत होणार आहे. राज्यात अवयवांची गरज असणाऱ्यांची मोठी प्रतीक्षा यादी आहे. त्या तुलनेत आपल्याकडे मेंदूमृत व्यक्तीचे अवयवदान होत नाही. याकरिता अवयवदान जनजागृतीची गरज असून, वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रातून यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. गेल्या काही वर्षांत अवयव निकामी झालेल्या रुग्णांत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. या अशा रुग्णांची राज्यातील प्रतीक्षा यादी महिन्यागणिक वाढत आहे. एका वर्षाला मेंदूमृत व्यक्तीकडून अवयव दान होण्याची संख्या आणि अवयवाची गरज असणाऱ्या रुग्णांची संख्या यामध्ये मोठी तफावत आहे.

सर्वोत्तम कामगिरी करणारी पाच राज्ये -  गेल्या वर्षात ज्या पाच राज्यांनी सर्वोत्तम कामगिरी केली आहे, त्यामध्ये तेलंगणा, तामिळनाडू, कर्नाटक, महाराष्ट्र आणि गुजरात राज्यांचा समावेश आहे. -  तेलंगणा अवयवदानात अग्रेसर आहे. गेल्यावर्षी तेलंगणामध्ये २००, तामिळनाडू आणि कर्नाटकात प्रत्येकी १७५ जणांनी अवयवदान केले. -  तर महाराष्ट्रात १४९ आणि गुजरातेत १४६ दात्यांनी अवयवदान केले.

राज्याची अवयवनिहाय प्रतीक्षा यादी ६१०२ किडनी १३६० यकृत ११५ हृदय ४६ फुफ्फुस २९ स्वादुपिंड २ छोटे आतडे 

महाअवयवदान ॲपमध्ये काय असणार? -  अवयवदान प्रतिज्ञा पत्राचा अर्ज -  अवयवदान करतानाचे नियम -  ज्या रुग्णांना अवयव हवा आहे त्यांना यावर अर्ज करता येणार -  दान करण्यात आलेले अवयवाचे वाटप करणे  -  अवयवांसाठी प्रतीक्षेत असणाऱ्या रुग्णांची संख्या  -  अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करणाऱ्या रुग्णालयांची यादी 

टॅग्स :अवयव दान