लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : अपोलो रुग्णालयात मंगळवारी अवयवदानामुळे चारजणांना जीवनदान मिळाले आहे. मृत्यू झालेल्या रुग्णाच्या नातेवाइकांना तेथील डॉक्टर आणि प्रत्यारोपणाच्या समन्वयकांनी कुटुंबीयांना अवयवदानाबद्दल माहिती दिली असता महिलेच्या कुटुंबीयांनी तत्काळ होकार दिल्याचे समन्वय समितीने सांगितले. मुंबईतील यंदाच्या वर्षांतील हे २३वे अवयवदान आहे.
डॉक्टरांनी केलेल्या तपासणीत मृताचे यकृत, स्वादुपिंड आणि दोन मूत्रपिंडाचे दान करता येईल अशी माहिती विभागीय अवयवदान आणि प्रत्यारोपण समितीला दिली. त्यानंतर या समितीने मार्गदर्शक तत्त्वे आणि निकषांनुसार दान आणि प्रत्यारोपण प्रक्रिया पार पाडली. मात्र, अवयव दात्याच्या कुटुंबीयांनी वैयक्तिक माहिती देण्यास संमती न दर्शविल्याने याविषयी गुप्तता पाळण्यात आल्याचे समितीने सांगितले
अवयवदानाबद्दल लोकांमध्ये जागृती होत आहे. कोरोना नियंत्रणात येत असल्याने अवयवदान टप्प्याटप्प्याने वाढत आहे. या अवयवदानामुळे चारजणांचे जीव वाचविण्यास मदत झाली आहे, अशी माहिती मुंबई विभागीय अवयवदान आणि प्रत्यारोपण समितीचे डॉ. एस. के. माथूर यांनी सांगितली.