संतोष आंधळे
मुंबई : राज्यात गेल्या काही वर्षांत अवयव प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया यशस्वी होत आहेत. अनेक रुग्ण अवयव प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियेकरिता पुढे येत आहेत. अवयवदानाचे प्रमाण अत्यल्प आणि अवयवांसाठी प्रतीक्षा यादीवरील रुग्णांची संख्या मात्र वाढती, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाने अवयवदान आणि प्रत्यारोपण यासंदर्भात सर्वंकष धोरण आणण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबाबतचा प्रस्ताव लवकरच मंत्रिमंडळापुढे ठेवण्यात येणार असल्याचे सूत्रांनी संगितले.
अवयवदान आणि प्रत्यारोपण शस्त्रक्रियांसंदर्भात राज्याचे सध्यातरी कोणतेही धोरण नाही; मात्र गेल्या काही वर्षांत मोठ्या अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया वाढल्या आहेत. अवयव प्रत्यारोपणासाठीच्या रुग्णांची प्रतीक्षायादी मोठी आहे. म्हणून मेंदू मृतांचे अवयवदान वाढविणे गरजेचे आहे; तसेच काही अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया आता शासकीय आणि महापालिकेच्या रुग्णालयांत केल्या जात आहेत. हे विचारात घेऊन वैद्यकीय शिक्षण विभागाने धोरण तयार केले आहे.
वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव दिनेश वाघमारे यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. ते म्हणाले की, लवकरच अवयवदान आणि प्रत्यारोपण शस्त्रक्रियांसंदर्भात राज्यात सर्वंकष धोरण आणले जाणार आहे.
मुख्यमंत्र्यांची सूचना काय होती?
काही महिन्यांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, अवयदात्याच्या अंत्यसंस्कारास शासकीय अधिकाऱ्याने उपस्थित राहावे, अशा सूचना दिल्या होत्या, मात्र त्यांचे पालन केले जात नाही.
धोरणात काय असेल?
डी.एम. (क्रिटिकल केअर मेडिसीन) हा तीन वर्षांचा पदव्युत्तर सुपर-स्पेशालिटी अभ्यासक्रम मेडिकल कॉलेजमध्ये सुरू करणे. ज्या ठिकणी तीन वर्षांचा पदव्युत्तर सुपर-स्पेशालिटी अभ्यासक्रम शक्य नाही तेथे फेलोशिप कोर्स सुरू करणे.
सर्व वैद्यकीय महाविद्यालयांना नॉन ट्रान्सप्लांट ऑर्गन रिट्रिव्हल सेंटर म्हणून परवानगी देणे. त्यामुळे अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया होत नसलेल्या रुग्णालयात मेंदूमृत रुग्ण आढळला आणि त्याच्या नातेवाइकांनी संमती दिली तर त्या रुग्णालयाला संबंधित मेंदूमृताचे अवयव काढण्याचा परवाना देण्याची तरतूद करणे शक्य होईल. अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करू शकणाऱ्या रुग्णालयांसाठी पायाभूत सुविधा निर्माण करणे.
अवयवदाता आणि त्याचे कुटुंबीय यांच्याप्रति कृतज्ञता दर्शविण्यासाठी अवयव दाता स्मारक उभारणे. स्मारकाच्या भिंतीवर अवयवदात्यांची नावे कोरणे. रुग्णाला मेंदूमृत घोषित केल्यानंतर अवयव काढण्यासाठी काही वेळ लागतो. तोपर्यंत त्यांच्या नातेवाइकांच्या राहण्याची व्यवस्था जिल्हाधिकाऱ्यांमार्फत करण्याबाबत विचार करणे.
‘३ ऑगस्ट’ राष्ट्रीय अवयवदान दिन
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अखत्यारीतील राष्ट्रीय अवयव आणि ऊती प्रत्यारोपण संस्थेच्या (नोटो) मागर्दर्शक तत्त्वानुसार, जुलै हा अवयदानाचा महिना म्हणून पाळण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
३ ऑगस्ट ‘राष्ट्रीय अवयवदान दिन’ म्हणून साजरा करण्यात यावा, असेही सुचविण्यात आले आहे. त्यानुसार जुलैमध्ये अवयवदान जनजागृती कार्यक्रम राबिवण्यात येत आहेत. तसेच ३ ऑगस्टला मरिन ड्राइव्ह येथे अवयवदान जनजागृती रॅली काढण्यात येणार आहे.