Join us

अवयवदात्यास मिळणार 42 दिवसांची विशेष रजा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2023 6:24 AM

केंद्र सरकारचा दिलासादायक निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : केंद्र सरकारच्या सेवेत असलेल्या कर्मचाऱ्याने कुटुंबातील जवळच्या व्यक्तीला अवयवदान केल्यास त्यास ४२ दिवसांची विशेष रजा देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. अवयवदान केल्यानंतर दात्याची प्रकृती पूर्वपदावर येण्यास काही काळ जाऊ द्यावा लागतो. या पार्श्वभूमीवर हा दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. सध्या कर्मचाऱ्यांना वर्षभरासाठी ३० विशेष रजा आहेत.

देशात मानवी अवयव आणि उती पेशी प्रत्यारोपण कायदा १९९४, नुसार अवयवदान शस्त्रक्रिया करण्यात येतात. त्यात आपल्या जवळच्या व्यक्तीला किडनी आणि यकृत (लिव्हर) हे दोनच अवयव देता येतात. गेल्या काही वर्षांत वैद्यकीय क्षेत्रातील प्रगतीमुळे अवयवदान शस्त्रक्रिया मोठ्या प्रमाणात यशस्वी होत आहेत. त्यामुळे अवयवदानासाठी अनेक जण पुढे येऊ लागले आहेत. मेंदूमृत व्यक्तीकडून अवयवदानास मात्र अनेकदा उशीर होतो. त्याची प्रतीक्षा यादीही भलीमोठी असते. या पार्श्वभूमीवर एखाद्याने कुटुंबातील जवळच्या व्यक्तीला अवयव दान करणे अधिक मोलाचे ठरते. या सर्व बाबी लक्षात घेऊन केंद्र सरकारने अवयवदान करणाऱ्या कर्मचाऱ्याला ४२ दिवसांची विशेष रजा देऊ केली आहे.

 अवयवदात्यास शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात दाखल व्हावे लागते. शस्त्रक्रिया केल्यानंतर दात्याची प्रकृती पूर्वपदावर येण्यास काही काळ जाऊ द्यावा लागतो.      हे गृहीत धरून ४२ दिवसांची विशेष रजा देण्याचे ठरविण्यात आले आहे. विशेष रजा इतर कोणत्याही रजेसोबत जोडून घेता येणार नाही.      अपवादात्मक परिस्थितीत जर शस्त्रक्रियेमध्ये काही गुंतागुंत निर्माण झाल्यास परवानाधारक डॉक्टरांच्या संमतीने अधिक रजा घेता येईल.

केंद्र सरकारचा हा उत्तम निर्णय आहे. अवयवदात्यास बरे होण्यासाठी काही काळ लागतो. या विशेष रजेमुळे नक्कीच दात्यास फायदा होईल. केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य शासनानेही असा निर्णय घ्यावा असे वाटते.- डॉ. भरत शाह, सरचिटणीस, मुंबई विभागीय अवयव प्रत्यारोपण समिती

टॅग्स :अवयव दानहॉस्पिटलमुंबई