राज्याच्या कोरोना टास्क फोर्सच्या वैद्यकीय तज्ज्ञांचे मत
स्नेहा मोरे
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : अवयव प्रत्यारोपित करण्यात आलेल्या व्यक्तीही कोरोनाप्रतिबंधक लस घेण्यासाठी पात्र असून, त्यासाठी केवळ उपचार सुरू असणाऱ्या डॉक्टरांचे मार्गदर्शन अत्यावश्यक असल्याची माहिती राज्याच्या कोरोना टास्क फोर्समधील वैद्यकीय तज्ज्ञांनी दिली. अवयव प्रत्यारोपित करण्यात आलेल्या व्यक्ती संवेदनशील गटातील असल्याने त्यांच्या औषधोपचारांच्या निरीक्षणानंतरच त्यांना लस देण्याचा निर्णय घेण्यात येत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
राज्याच्या कोरोना टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनी सांगितले की, केंद्र शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार अवयव प्रत्यारोपित केलेल्या व्यक्तींनाही प्रतिबंधक लस घेण्याची संमती आहे; परंतु या व्यक्तींना आयुष्यभरासाठी काही औषधोपचार सुरू असतात. त्यामुळे वैद्यकीय तज्ज्ञांच्या सूचनेनुसार औषधोपचारांची माहिती करून त्यानंतरच ते लस घेऊ शकतात. अशा व्यक्तींनी लस घेतल्यानंतर दुष्परिणाम झाल्याची प्रकरणे नसल्याचेही त्यांनी नमूद केले. अमेरिकेतील संशोधन हे केवळ निरीक्षण असून, आपल्याकडे अशा स्वरूपाचे संशोधन होणे गरजेचे आहे; मात्र आतापर्यंत अशा कोणत्याही स्वरूपाच्या तक्रारी किंवा प्रकरणे समोर आलेली नसल्याचे त्यांनी सांगितले.
* लस घ्या, नियमांचे पालन करा
अवयव प्रत्यारोपण झालेल्या व्यक्ती आपली प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी नव्हे तर कमी करण्यासाठीची काही औषधे घेत असतात. शरीराने ते प्रत्यारोपण स्वीकारावे, यासाठी ही औषधे दिली जातात. त्यामुळे हा अतिजोखमीचा गट आहे, याकरिता अवयव प्रत्यारोपित व्यक्तीने लस घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. लस घेतल्यानंतरही दुहेरी मास्क, सॅनिटायझरचा वापर आणि शारीरिक अंतर या नियमांचे काटेकोर पालन करणे गरजेचे आहे. लस घेतल्यानंतरही कोरोना संसर्गाचा धोका असतो; परंतु त्याची तीव्रता कमी असते.
- डॉ. सतीश माथुर,
अध्यक्ष, मुंबई जिल्हे अवयव प्रत्यारोपण समिती
* अमेरिकेतील संशोधन काय सांगते?
अमेरिकन मेडिकल असोसिएशनने नुकत्याच केलेल्या संशोधन अहवालानुसार, अवयव प्रत्यारोपण केलेल्या ६५८ लाभार्थ्यांपैकी केवळ ९८ लाभार्थ्यांच्या शरीरात प्रतिपिंड निर्माण झाल्याचे दिसून आले आहे. या अहवालातील निष्कर्षाअंती दोन डोसनंतरही अवयव प्रत्यारोपित केलेल्या व्यक्तींमध्ये रोगप्रतिकारकशक्ती निर्माण होत नाही. या व्यक्तींच्या औषधोपचारांमुळे असे होत असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे लस घेतल्यानंतरही कोरोनाविषयक नियमांचे काटेकोर पालन करावे, असे मत निरीक्षण तज्ज्ञांनी नाेंदवले.
............................