अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया आता खिशाला परवडणार?
By संतोष आंधळे | Published: July 14, 2024 12:07 PM2024-07-14T12:07:48+5:302024-07-14T12:08:28+5:30
पालिका रुग्णालयात शस्त्रक्रिया झाल्याने गरजूंच्या आशा पल्लवित
मुंबई : सहा दशकानंतर महापालिकेच्या रुग्णालयात हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झाल्याने अनेक गरजू रुग्णांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. ३५ ते ४० लाख रुपये खर्च येणाऱ्या प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया सार्वजनिक रुग्णालयात झाल्या तर रुग्णांना परवडणाऱ्या खर्चात उपचार शक्य होणार आहे. मात्र, राज्यातील अन्य सार्वजनिक रुग्णालयांतही अवयव प्रत्यारोपण करणे गरजचे असल्याचे मत वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले.
सद्यःस्थितीत हृदय, फुप्फुस, लिव्हर, किडनी, स्वादुपिंड, लहान आतडे आणि हाताच्या प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया राज्यातील खासगी रुग्णालयांत केल्या जातात. त्यासाठी येणारा खर्च गरीब रुग्णांना परवडत नाही. त्यामुळे प्रतीक्षायादीतील रुग्ण अवयव मिळाला तरी पैशांअभावी शस्त्रक्रिया करण्यास नकार देतात. अवयव प्रत्यारोपणाचा खर्च हा खासगी रुग्णालयात १० ते ५० लाखांपर्यंत येतो. राज्यातील काही सार्वजनिक रुग्णालयांत किडनी प्रत्यारोपणाव्यतिरिक्त अन्य अवयवांच्या प्रत्यारोपण शस्त्रक्रिया होत नाही.
अवयवदानासाठी जनजागृतीची गरज
राज्यात अवयवांची गरज असणाऱ्यांची मोठी प्रतीक्षा यादी आहे. ज्या अवयवांची गरज आहे, त्या तुलनेत आपल्याकडे मेंदूमृत व्यक्तीचे अवयवदान होत नाही. याकरिता अवयवदान जनजागृतीची गरज असून, वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रातून यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. मेंदूमृत व्यक्तीकडून अवयवदान होण्याची संख्या आणि गरजू रुग्णांची संख्या यामध्ये मोठी तफावत आहे.
यामुळे होत नाही अवयवदान...
वरिष्ठ डॉक्टरने दिलेल्या माहितीनुसार, मेंदूमृत रुग्ण सार्वजनिक रुग्णालयात येत असतात. मात्र, मनुष्यबळ कमी असल्याने त्यांना त्या रुग्णाच्या नातेवाइकांची संमती घेणे, प्रत्यारोपणासाठी अवयव काढेपर्यंत रुग्णाला विविध गोष्टीची गरज असते. त्याची अनेक सार्वजनिक रुग्णालयांत व्यवस्था नसते. त्यामुळे या रुग्णालयांत फारसे अवयवदान होत नाही.
सरकारी रुग्णालयात डॉक्टरांचे मनुष्यबळ कमी असते. त्याशिवाय इतर रुग्णांची संख्या अधिक असते. त्यांना उपचार देणे हे त्यांचे प्राधान्य असते. मात्र, के.ई.एम. रुग्णालयाने ज्या पद्धतीने लिव्हर आणि हृदय प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया चालू केल्या आहेत, त्यासाठी काही विशेष डॉक्टरांची नेमणूक केली आहे. रुग्णालयात पायाभूत सुविधा उभारल्यामुळे शस्त्रक्रिया शक्य होत आहेत. वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न रुग्णालयात अशा पद्धतीच्या शस्त्रक्रिया करणे शक्य आहे. त्यामुळे परवडणाऱ्या दरात अवयव प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया करणे सोपे होणार आहे - डॉ. भरत शहा, सरचिटणीस, मुंबई विभागीय प्रत्यारोपण समन्वय समिती
राष्ट्रीय अवयव आणि उती प्रत्यारोपण संस्थांची काही मार्गदर्शक तत्त्वे प्राप्त झाली आहेत. त्याचा अभ्यास करून रुग्णालय अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रियेचा प्रस्ताव तयार करण्यात येतो. अशा शस्त्रक्रिया सुरू करण्यासाठी शाश्वत धोरण तयार करण्यात येत असून शासनाची भूमिका सकारात्मक आहे - राजीव निवतकर, आयुक्त्त, वैद्यकीय शिक्षण विभाग