मुलुंड येथील ४० वर्षीय महिलेचे अवयवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 03:50 AM2018-02-26T03:50:45+5:302018-02-26T03:50:45+5:30
घरात पडल्याने मुलुंड येथील ४० वर्षीय महिलेला स्थानिक नर्सिंग होममध्ये दाखल करण्यात आले. त्यानंतर, पुढील उपचारासाठी रविवारी रुग्णालयात दाखल केले असता, तिला डॉक्टरांनी ब्रेनडेड घोषित केले.
मुंबई : घरात पडल्याने मुलुंड येथील ४० वर्षीय महिलेला स्थानिक नर्सिंग होममध्ये दाखल करण्यात आले. त्यानंतर, पुढील उपचारासाठी रविवारी रुग्णालयात दाखल केले असता, तिला डॉक्टरांनी ब्रेनडेड घोषित केले. त्या वेळी तिच्या पती आणि कुटुंबीयांनी समुपदेशनाअंती अवयवदानाचा निर्णय घेतला. त्यामुळे सिल्व्हासा येथील २४ वर्षीय तरुणाला नवसंजीवनी मिळाली आहे.
मुलुंड येथील रुग्णालयातील आॅगस्ट २०१५पासून रविवारी झालेले हे ८६वे हृदय प्रत्यारोपण यशस्वीपणे पार पडले. या महिलेने हृदय, यकृत, फुप्फुसे आणि मूत्रपिंड दान केले. सिल्व्हासा येथील २४ वर्षीय तरुण हृदय आणि यकृत प्रत्यारोपणासाठी आॅगस्ट २०१७ पासून प्रतीक्षायादीत होता. त्यामुळे त्याच्यावर त्वरित प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली. या २४ वर्षीय रुग्णाला हृदय आणि यकृत दान करण्यात आले, तरफुप्फुसे चेन्नईला एका खासगी रुग्णालयात पाठविण्यात आले. १ मूत्रपिंड आयएनएस अश्विनी कुलाबा रुग्णालयात, तर दुसरे पेडर रोड येथील खासगी रुग्णालयात पाठविण्यात आले.
अहमदनगरच्या महिलेचे अवयवदान-
अहमदनगर येथील ५३ वर्षीय महिलेला डोके दुखत असल्याने, रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रकृती सुधारत नसल्याने शनिवारी रात्री मुंबईत खासगी रुग्णालयात नेण्यात आले. त्या वेळी डॉक्टरांनी ब्रेनडेड घोषित केले.
त्यानंतर, कुटुंबीयांचे समुपदेशन केल्यानंतर अवयवदानाचा निर्णय घेण्यात आला. त्या वेळी दोन्ही मूत्रपिंड, यकृत, त्वचा, दोन्ही डोळे दान केले आहेत. त्यात मूत्रपिंड महाराष्ट्र पोलीस दलातील कर्मचारी ४७ वर्षीय रुग्णाला प्रत्यारोपित करण्यात आले.
तर दुसरे यकृत नवी मुंबईतील ५२ वर्षीय महिलेला प्रत्यारोपित करण्यात आले, तर १ मूत्रपिंड चर्चगेट येथील खासगी रुग्णालयात, तर यकृत ठाणे येथील खासगी रुग्णालयात पाठविले. याशिवाय, डोळे ठाणे येथील नेत्रपेढीला पाठविले, तर त्वचा नॅशनल स्कीन सेंटरला पाठविण्यात आली.