महापरीक्षा पोर्टल बंद करण्यासाठी संघटना आक्रमक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2019 01:35 AM2019-12-04T01:35:56+5:302019-12-04T01:36:14+5:30
विद्यार्थी नुकसान टाळण्यासाठी पोर्टल बंद करण्यात यावे
मुंबई : महापरीक्षा पोर्टलमुळे होणारे विद्यार्थी नुकसान टाळण्यासाठी पोर्टल बंद करण्यात यावे, तसेच पुढील महिन्यात महापरीक्षा पोर्टलमार्फत घेण्यात येणाऱ्या विविध भागांतील परीक्षा रद्द करून एमपीएससीमार्फत त्या घेतल्यास परीक्षेमध्ये पारदर्शकता येऊन विद्यार्थ्यांचा सरकारवरील विश्वास वाढेल, असे मत प्रहार संघटनेमार्फत व्यक्त केले आहे.
मागील सरकारने पदभरतीसाठी कंत्राट देऊन नियुक्त केलेल्या कंपनीने परीक्षा घेताना जो गोंधळ घातला, त्यामुळे सामूहिक कॉपी, अभ्यासक्रमानुसार परीक्षा न होणे, प्रश्नाची पुनरावृत्ती होणे, परीक्षा केंद्रात मोबाइल व इलेक्ट्रॉनिक उपकरणाचा वापर होणे, परीक्षा केंद्रावर बैठक व्यवस्था नीट नसणे, वेळेवर परीक्षा रद्द होणे, हजेरी बायोमेट्रिक पद्धतीने न होणे, डमी उमेदवार पकडल्यानंतर पोलीस कारवाई न होणे इत्यादी अनेक कारभार झाल्याचे आरोप प्रहार संघटनेचे अध्यक्ष मनोज टेकाडे यांनी केला आहे.
महापरीक्षा पोर्टल बंद करण्यासाठी महाराष्ट्रात जिल्हा-तालुका स्तरावर ७०पेक्षा जास्त मोर्चे विद्यार्थ्यांनी काढले, महाराष्ट्रातील हजारो विद्यार्थ्यांची मागणी मान्य करून, आपण त्यांना न्याय द्याल, अशी अपेक्षा संघटनेकडून माहिती तंत्रज्ञान विभागाच्या प्रधान सचिवांकडे निवेदन देऊन व्यक्त करण्यात आली आहे.