भारुडाच्या माध्यमातून अवयवदानाची जनजागृती
By Admin | Published: August 30, 2016 03:45 AM2016-08-30T03:45:07+5:302016-08-30T03:45:07+5:30
‘अवयवदान हेच श्रेष्ठ दान’, ‘मरावे परी अवयवरूपी उरावे’, ‘मृत्यूनंतरही दुसऱ्याच्या उपयोगी पडू शकता, अवयवदान करा’ हे विचार सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी राज्य सरकारने अवयवदान जनजागृतीसाठी अभियान हाती
मुंबई : ‘अवयवदान हेच श्रेष्ठ दान’, ‘मरावे परी अवयवरूपी उरावे’, ‘मृत्यूनंतरही दुसऱ्याच्या उपयोगी पडू शकता, अवयवदान करा’ हे विचार सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी राज्य सरकारने अवयवदान जनजागृतीसाठी अभियान हाती घेतले आहे. भित्तीपत्रके, जाहिराती, माहितीपत्रकांमधून जनजागृतीबरोबरच भारुडाच्या माध्यमातून भारुडकार निरंजन भाकरे हे मुंबईतील रेल्वे स्थानकांवर सध्या जनजागृती करत आहेत.
लोककलेच्या माध्यमातून अनेक विषयांवर जनजागृती केल्यास त्याचा परिणाम तत्काळ दिसून येतो. हे लक्षात घेऊनच लोककलेच्या माध्यमातून शासनाने अवयवदानाची जनजागृती करण्याचा निर्णय घेतला आहे. भारुडकार निरंजन भाकरे यांनी संत तुकाराम यांच्या अभंगावरून सीएसटी, दादर आणि कुर्ला स्थानकावर आज अवयवदानाविषयी जनजागृती केली. तीन दिवसीय अवयवदान महाअभियानात रेल्वे स्थानकांवर आणि सार्वजनिक ठिकाणी भारुडाच्या माध्यमातून जनजागृती करणार आहेत.
आजारांचे प्रमाण वाढत असल्यामुळे त्याचा थेट परिणाम अवयवांवर होतो. अवयव निकामी झाल्यास औषधोपचारांपेक्षा अवयव प्रत्यारोपण करणे हा पर्याय असतो. जिवंत व्यक्ती नातेवाइकांना मूत्रपिंड, यकृत दान करू शकते. तर मेंदू मृतावस्थेत गेलेल्या व्यक्तीही अवयवदान करू शकतात. मृत्यूनंतर शरीराची राख होण्यापेक्षा किंवा पुरले जाण्यापेक्षा देहदान केल्यास मृत्यूनंतरही दुसऱ्यांच्या उपयोगी पडू शकतो. त्यामुळे सर्वांनी अवयवदान अथवा देहदान केले पाहिजे, असे आवाहन भारुडकार निरंजन भाकरे यांनी केले.
१५ हजार जणांनी घेतली अवयवदानाची शपथ
राज्य सरकारने सुरू केलेल्या अवयवदान महाअभियानाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे. राज्य सरकारने अवयवदानासाठी सुरू केलेल्या आॅनलाइन नावनोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. आतापर्यंत १५ हजार जणांनी अवयवदानाची शपथ घेतली आहे.
अभिनेत्री रविना टंडन नानावटीची सदिच्छादूत
अवयवदानाची चळवळ शहरापुरती मर्यादित न राहता खेड्यापाड्यात पोहोचली पाहिजे. यासाठी विशेष प्रयत्न होण्याची गरज आहे. यासाठी नानावटी रुग्णालयाने कार्यक्रम हाती घेतला आहे. अवयवदानाच्या कार्यक्रमासाठी अभिनेत्री रविना टंडन हिला नानावटी रुग्णालयाने सदिच्छा दूत केले आहे. अवयवदानाविषयी जनजागृती करण्यासाठी रविना या कार्यक्रमात सहभागी झाली असून तिने स्वत: अवयवदानाची प्रतिज्ञा केली आहे.