रोहितच्या न्यायासाठी संघटनांचा एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2016 03:52 AM2016-02-02T03:52:12+5:302016-02-02T03:52:12+5:30

हैदराबाद विद्यापीठातील विद्यार्थी रोहित वेमुला यांच्या आत्महत्येला जबाबदार असणाऱ्यांवर तातडीने गुन्हे दाखल करावेत, अशी एकमुखी मागणी करत जस्टिस फॉर रोहित जॉइंट अ‍ॅक्शन कमिटीसह

Organizations Eligibility for Rohit's Justice | रोहितच्या न्यायासाठी संघटनांचा एल्गार

रोहितच्या न्यायासाठी संघटनांचा एल्गार

Next

मुंबई : हैदराबाद विद्यापीठातील विद्यार्थी रोहित वेमुला यांच्या आत्महत्येला जबाबदार असणाऱ्यांवर तातडीने गुन्हे दाखल करावेत, अशी एकमुखी मागणी करत जस्टिस फॉर रोहित जॉइंट अ‍ॅक्शन कमिटीसह राजकीय आणि सामाजिक संघटनांनी राणीबाग ते सीएसटीपर्यंत प्रतिकार मोर्चा काढला. वेमुलाप्रकरणी संबंधितांवर गुन्हे दाखल न झाल्यास पुन्हा रस्त्यावर उतरू, असा इशारा अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी दिला. या मोर्चामुळे दक्षिण मुंबईतील वाहतूक विस्कळीत झाली.
सोमवारी जस्टिस फॉर रोहित जॉइंट अ‍ॅक्शन कमिटी मुंबईच्या वतीने राणीबाग ते सीएसटीपर्यंत मोर्चा काढण्यात आला. घोषणाबाजी, विद्रोही जलशांच्या आवाजाने दक्षिण मुंबई दणाणून गेली. या मोर्चामध्ये विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.
दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास सुरू झालेल्या मोर्चा संथ गतीने पुढे सरकत होता. मोर्चाला जे.जे. उड्डाणपुलाखालून सीएसटीकडे जाण्यास पोलिसांनी मज्जाव केला. त्यामुळे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. अखेर मोर्चा शांतते पार पडावा, यासाठी कार्यकर्त्यांनी पोलिसांना सहकार्य करण्याचे ठरवत मोर्चा जे.जे. उड्डाणपुलावरून सीएसटीच्या दिशेने निघाला. भाजपा सरकार आणि अभाविप विरोधात घोषणाबाजी करत मोर्चा चार वाजण्याच्या सुमारास महापालिकेजवळ आला. संघटनेने विधान भवनावर मोर्चा काढण्याची हाक दिल्याने पोलिसांनी महापालिका आणि सीएसटीसमोरील चौकातील वाहतूक बंद ठेऊन कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवला होता. त्यामुळे रस्त्याच्या मधोमध मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी मोर्चाला संबोधित केले.
सरकारने तातडीने हैद्राबाद विद्यापीठाच्या कुलगुरुंना निलंबित करावे आणि दोषींवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी सभेत केली. या इशारा आंदोलनानंतरही सरकारने न ऐकल्यास, पुन्हा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आंबेडकरांनी दिला. पोलिसांनी विनंती केल्याने विधानभवनाकडे मोर्चा नेला नाही.
या प्रसंगी रोहित वेमुलासोबत विद्यापीठातून निलंबित करण्यात आलेल्या प्रशांत बांता या विद्यार्थ्यानेही सभेला संबोधित केले. रोहितला न्याय मिळेपर्यंत कमिटीचे आंदोलन सुरूच राहील, असे सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Organizations Eligibility for Rohit's Justice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.