दलित युवकाच्या मृत्यूप्रकरणी संघटना एकवटल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2020 06:35 AM2020-06-13T06:35:58+5:302020-06-13T06:36:20+5:30
सीबीआय चौकशीची मागणी
मुंबई : नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्याच्या पिंपळधरा येथे आंबेडकरी चळवळीतील एक कार्यकर्ते अरविंद बनसोड यांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी सखोल चौकशी करून दोषींविरुद्ध कठोर कारवाईची मागणी दलित संघटना आणि नेत्यांनी केली आहे.
वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड.प्रकाश आंबेडकर यांनी बनसोड यांच्या मृत्यूप्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. बनसोड यांची आत्महत्या नसून हत्या करण्यात आली. मात्र पोलीस ही आत्महत्या असल्याचा बनाव करीत आहेत. मारेकऱ्यांचे राजकीय लागेबांधे असल्यामुळे कारवाई होत नसल्याचा आरोप आंबेडकर यांनी केला आहे. अरविंद यांचा २७ मे रोजी मृत्यू झाला. भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आजाद त्यांनीही बनसोड यांच्या संशयास्पद मृत्यूची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे. अरविंद बनसोड हे दलितांच्या दलितांना न्याय मिळवून देण्यासाठी संघर्ष करणारे कार्यकर्ते होते. ते उच्चशिक्षित होते व स्पर्धापरीक्षेची तयारी करीत होते. स्थानिक पंचायत समिती सदस्य मिथिलेश बंडोपंत उमरकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अरविंद यांना जबर मारहाण केली आणि थोड्याच वेळात त्यांचा मृत्यू झाला. घटनेच्या ठिकाणी विषाची बाटली आढळली. हा एकूणच प्रकार संशयास्पद असून त्याची उच्चस्तरीय चौकशी करा, अशी मागणी रिपब्लिकन पक्ष,आॅल इंडिया पँथर सेना आदींनी केली आहे.
बहुजन समाज पाटीर्चे प्रदेश अध्यक्ष अॅड. संदीप ताजने अरविंद यांच्या कुटुंबाची भेट घेतली. अरविंद यांच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करावी व त्यांच्या कुटुंबास शासनाने पन्नास लाख रुपयांची मदत करावी, अशी मागणी त्यांनी केली.
अरविंद बनसोड यांच्या मृत्यूची चौकशी नि:पक्षपातीपणे करण्यात येईल. तसे निर्देशही आपण पोलीस विभागाला दिले आहेत. तसेच या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता तपास उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडे दिला आहे.
- अनिल देशमुख, गृहमंत्री