सोनोग्राफी संदर्भातील कायद्यावरुन संघटनांत जुंपली
By admin | Published: April 15, 2015 02:05 AM2015-04-15T02:05:51+5:302015-04-15T02:05:51+5:30
बेकायदेशीररित्या होणाऱ्या गर्भलिंग निदानाला आळा घालण्यासाठी सोनोग्राफी सेंटरवर करडी नजर ठेवली जाते. या कडक नियमांमध्ये कारकूनी कामात चूक राहिल्यावरही कारवाई होते.
मुंबई : बेकायदेशीररित्या होणाऱ्या गर्भलिंग निदानाला आळा घालण्यासाठी सोनोग्राफी सेंटरवर करडी नजर ठेवली जाते. या कडक नियमांमध्ये कारकूनी कामात चूक राहिल्यावरही कारवाई होते. त्यामूळे अशा प्रकारच्या कारवाई विरोधात आवाज उठवण्यासाठी १५ एप्रिलला देशव्यापी आंदोलन जाहीर झाले. पण, यामधील संघटनांमध्ये सध्या दुफळी माजली आहे. यातील एक संघटना संपामध्ये उतरण्याच्या बाजूने आहे तर दुसऱ्या संघटनेने संपात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे.
इंडियन सोनोलॉजिस्ट अॅण्ड गायनॅकॉलॉजिस्ट असोसिएशनने देशव्यापी संप पुकारला आहे. तर इंडियन रेडिओलॉजिकल अॅण्ड इमेजिंग असोसिएशन या संपात सहभागी होणार नाही. या संपाला इंडियन मेडिकल असोसिएशनने पाठिंबा दर्शवत ‘सेफ गेम’ खेळला आहे. आयएमएचे डॉक्टर प्रत्यक्ष संपात सहभागी होणार नसले, तरीही काळ््या फिती बांधून काम करतील. त्यामुळे या संपाचा तिढा अजूनच वाढला आहे.
प्रसूतीपूर्व गर्भलिंगनिदान प्रतिबंधक कायद्याच्या अंतर्गत करण्यात आलेल्या ९५ टक्के कारवाया या नोंदी ठेवण्यात आलेल्या किरकोळ चुकांमुळे झाल्या आहेत. ५०० हून अधिक कारवाया डॉक्टरने अॅप्रन न घालणे, संबंधित महिलेचा मोबाइल क्रमांक न भरणे, फॉर्मवर शॉर्ट सही करणे अशा नोंदी न केल्याने झाल्या आहेत. मात्र त्यानंतर होणारा त्रास हा खूप भयंकर आहे. याचा निषेध म्हणून देशभरातील सोनोलॉजिस्ट आणि गायनॅकॉलॉजिस्ट सोनोग्राफी सेंटर बंद ठेवणार आहेत. मुंबईत ४०० तर महाराष्ट्रात दीड हजार सोनोग्राफी सेंटर बुधवारी बंद राहतील, अशी माहिती इंडियन सोनोलॉजिस्ट अॅण्ड गायनॅकॉलॉजिस्ट असोसिएशनचे प्रवक्ते डॉ. शरद मालवडकर यांनी दिली. (प्रतिनिधी)
च्गर्भलिंद निदानासाठी असलेले काही नियम बदलायचे आहेत. यासाठी चर्चा होण्याची आवश्यकता आहे. दोन आठवड्यापूर्वी आरोग्यमंत्री दीपक सावंत यांना आम्ही भेटलो होतो. १२ एप्रिलनंतर ते आम्हाला वेळ देणार असल्याचे त्यांनी सांगितले होते.
च्चर्चा करून प्रश्न मार्गी लागू शकतो, असा आमचा विश्वास आहे. यामुळे या संपात सहभागी होणार नसल्याचे इंडियन रेडिओलॉजिकल अॅण्ड इमेजिंग असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. जिग्नेश ठक्कर यांनी सांगितले.