हॅप्पी अवर्समध्ये भाडे सवलतीला संघटनांचा विरोध
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2019 04:20 AM2019-06-23T04:20:56+5:302019-06-23T04:21:10+5:30
टॅक्सीला भाडेवाढ करण्यास ग्राहक पंचायतीने सहमती दिली आहे़ परंतु ओला-उबेरप्रमाणे हॅपी अवर्समध्ये भाडे सवलतीची मागणी केली आहे. त्याला टॅक्सीमेन्स युनियनने विरोध दर्शविला आहे.
मुंबई - टॅक्सीला भाडेवाढ करण्यास ग्राहक पंचायतीने सहमती दिली आहे़ परंतु ओला-उबेरप्रमाणे हॅपी अवर्समध्ये भाडे सवलतीची मागणी केली आहे. त्याला टॅक्सीमेन्स युनियनने विरोध दर्शविला आहे.
रिक्षा-टॅक्सी भाडेवाढीसंदर्भात मंत्रालयात शुक्रवारी परिवहन विभाग, टॅक्सी संघटना आणि मुंबई ग्राहक पंचायत यांच्यामध्ये बैठक झाली. या वेळी परिवहन सचिव आशिष सिंह, परिवहन आयुक्त शेखर चन्ने, मुंबई टॅक्सीमेन्स युनियनचे सरचिटणीस ए. एल. क्वाड्रोस, मुंबई ग्राहक पंचायतीचे अध्यक्ष शिरीष देशपांडे उपस्थित होते.
मंत्रालयात झालेल्या या संयुक्त बैठकीत रिक्षा-टॅक्सी भाडेवाढीबाबत चर्चा झाली. टॅक्सी संघटनेने ३० रुपये भाडेवाढीच्या ऐवजी २५ रुपये तरी भाडेवाढ द्या, अशी मागणी केली. त्याला ग्राहक पंचायतीने सहमती दिली. भाडेवाढ दिली तर खटुआ समितीच्या शिफारशीनुसार पुढील आठ किलोमीटरच्या प्रवासात १५ ते २० टक्के प्रवास सवलत आणि दुपारी १२ ते सायंकाळी ४ वेळेत १५ टक्के प्रवास सवलत लागू करण्याची मागणी मुंबई ग्राहक पंचायतीचे अध्यक्ष शिरीष देशपांडे यांनी केली. त्याबाबत ए.एल. क्वाड्रोस म्हणाले की, टॅक्सीचे मीटर ठरलेले असते. त्यामध्ये बदल करणे शक्य नाही. तसेच ग्राहकही ठरलेले नसतात. १२ ते ४ या वेळेत भाडे कमी केले तर टॅक्सीचालकांना नुकसान सहन करावे लागेल. असे भाडे कमी करता येणार नाही. यावर परिवहन विभागाने दोघांनाही लेखी निवेदन सोमवारपर्यंत सादर करण्यास सांगितले व मंगळवारी पुन्हा बैठक आयोजित केली असून भाडेवाढीवर पुन्हा चर्चा होणार आहे.
बेस्टकडून धडा घेण्याची गरज
टॅक्सीच्या भाडेवाडीला विरोध नाही. खटुआ समितीच्या इतर शिफारशीही लागू कराव्यात. ८ ते १२ किमीसाठी १५ टक्के आणि १२ किमीनंतर २० टक्के सवलत द्यायला हवी, परंतु युनियनचा विरोध आहे. स्पर्धेत टिकायचे असेल तर सुधारणा आणि गुणवत्ता आवश्यक आहे. त्यांनी सेवा सुधारली नाही तर लोकांना ओला-उबेरचा पर्याय उपलब्ध आहे. आता बेस्टवरही भाडे कपातीची वेळ आली आहे. त्यांनी बेस्टकडून धडा घेण्याची गरज आहे.
- शिरीष देशपांडे, अध्यक्ष, मुंबई ग्राहक पंचायत