'भटके विमुक्त पंधरवडा आॅगस्टमध्ये आयोजित करा'
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2018 04:23 AM2018-07-19T04:23:25+5:302018-07-19T04:23:35+5:30
‘राईनपाडा’ हत्याकांडांच्या पार्श्वभूमीवर भटके विमुक्त समाजातील दहशत दूर करण्यासाठी सरकार आणि समाज म्हणून सर्वांनी धीर देण्याची गरज आहे.
मुंबई : ‘राईनपाडा’ हत्याकांडांच्या पार्श्वभूमीवर भटके विमुक्त समाजातील दहशत दूर करण्यासाठी सरकार आणि समाज म्हणून सर्वांनी धीर देण्याची गरज आहे. त्यासाठी १५ ते ३१ आॅगस्ट हा पंधरवडा भटके विमुक्त पंधरवडा पाळण्यात यावा, अशी मागणी हेरंब कुलकर्णी, दिनकर गांगल, डॉ. अनिल अवचट, फ्रान्सिस दिब्रिटो, डॉ. कुमार सप्तर्षी आदींनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून केली आहे.
पंधरवड्यात विविध संवाद कार्यक्रम व त्यांच्या प्रश्नावर कृती कार्यक्रम व्हावेत. भटके विमुक्तांच्या वस्त्या, पाले येथे पालकमंत्री, खासदार, आमदार व लोकप्रतिनिधींनी भेट द्यावी. त्यांच्या समस्या ऐकून त्यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न करावा, असे निवेदनात म्हटले आहे. रेशनकार्ड, मतदारयादी, जातीचे दाखले, आधारकार्ड यासाठी त्यांनी संघर्ष करायचा का? पावसाळ्यात बहुसंख्य भटके मूळ गावातच राहतात. त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रशासनाने मदत करावी. मुख्यमंत्र्यांनी विविध संस्था व कार्यकर्त्यांची बैठक घेऊन वर्षासाठीचा कृती कार्यक्रम ठरवावा. त्याचा दर महिन्याला पाठपुरावा करावा, अशीही मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.
>निवेदनात काय !
मंत्री राम शिंदे व खात्याचे सचिव यांचेकडे जबाबदारी सोपवावी. राईनपाडा हत्याकांडांची सुनावणी लवकर पूर्ण व्हावी. पीडित कुटुंबांचे पुनर्वसन तातडीने व्हावे. नागपूर व भंडारा जिल्ह्यात काही ठिकाणी भटक्यांच्या वस्तीवर हल्ले करणे, त्यांना गावातून हुसकावून देण्याचे प्रकार घडले आहेत. या गुन्ह्यांची चौकशी व्हावी, असेही निवेदनात म्हटले आहे. डॉ. दत्तप्रसाद दाभोलकर, सुभाष वारे, प्रज्ञा दया पवार, उल्का महाजन, डॉ. विश्वंभर चौधरी, हरी नरके, शमशुदिन तांबोळी यांनीही या निवेदनास पाठिंबा दिला आहे.