मुंबई: जैन समाजाचे विद्वान तपस्वी गुरुदेव आचार्य श्री कामकुमार नंदी जी महाराज यांच्या आश्रमात घुसून, काही समाजकंटकांनी त्यांची निघृण हत्या केली होती. ६ ते ७ जुलै दरम्यान त्यांच्या आश्रमात जबरदस्ती घुसून मारहाण करण्यात आली. इलेक्ट्रिक शॉक देऊन यातना दिल्या गेल्या आणि त्यांच्या शरीराचे तुकडे करून फेकून देण्यात आले. या निघृण हत्येमुळे जैन समाज अतिशय दुखावला असून, या घटनेचा निषेध करण्यासाठी मुंबईमधील समस्त जैन समाज संघठनांकडून 'विशाल मौन रॅली'चे आयोजन मुंबईमधील भुलेश्वर परिसरात असलेल्या गुलालवाडी मंदिर येथे करण्यात आले होते. जैन समाजच्या मागणीला समर्थन देण्यासाठी मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी देखील रॅलीमध्ये सहभाग नोंदवला.
तपस्वी गुरुदेव आचार्य श्री कामकुमार नंदी जी महाराज यांच्या हत्येचा निषेध व्यक्त करत जैन धर्म श्रमण, तीर्थ आणि समाजाच्या संरक्षणासाठी सर्व राज्यातील अल्पसंख्यांक आयोगात जैन सदस्यांची नियुक्ती आणि जैन कल्याण बोर्डाचे गठन करण्याची मागणी या रॅलीमार्फत करण्यात आली. जैन समाज हा शांतता प्रिय असून, या समाजातील गुरूंचे स्थान अतिशय श्रद्धेचे आहे. प. पू. श्री १०८ कामकुमारनंदी मुनिराज जी यांची झालेली हत्या अतिशय दुःखद असून, दोषींना शासन झालेच पाहिजे. समाज विघातक प्रवृत्तींना नष्ट करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करून, न्याय मिळवू असा विश्वास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी यावेळी व्यक्त केला. कर्नाटकात झालेल्या या घटनेचा निषेध व्यक्त करत मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी काही जैन संघटनांसह १० जुलै २०२३ रोजी महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतली होती आणि दोषींवर त्वरित कार्यवाही व्हावी यासाठी निवेदन दिले होते.
त्याचबरोबर संपूर्ण देशात जैन साधू आणि साध्वी जिथे प्रवास आणि निवास करतील अशा ठिकाणी योग्य सुरक्षा व्यवस्था असावी, त्यांच्या पदयात्रेदरम्यान राजकीय अतिथींप्रमाणे पोलीस संरक्षण मिळावे, असे देखील निवेदन राज्यपाल महोदयांना पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिले होते. जैन समाजातील तपस्वींची साधना ही आपल्या संस्कृतीला आणि समाजाला पुढे नेणारी असून, त्यांच्या साधनेत अडथळा येऊ नये यासाठीत त्यांना संरक्षण मिळावे अशी मागणी मंगलप्रभात लोढा यांनी आपल्या निवेदनामार्फत केली होती.