मनोहर कुंभेजकर
मुंबई-महायुती सरकारच्या काळात दणक्यात हिंदू सण साजरे होत असून दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबई भाजपातर्फे ४०० हून अधिक ठिकाणी दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. वरळी विधानसभा मतदारसंघातील जांबोरी मैदानातून परिवर्तनाची दहीहंडी सोहळ्याला प्रारंभ होणार आहे.
त्याचबरोबर मुंबई भाजपाकडून ४५० मंडळांच्या २५ हजार गोविंदांना १० लाखाचे विमा कवच देण्यात आले आहे. याखेरीज मुंबईतील भाजप नेते खासदार, आमदार, स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आपापल्या विभागात मोठ्या प्रमाणावर दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले आहे अशी माहिती मुंबई भाजपाचे अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार यांनी दिली. वरळी जांबोरी मैदानावरील दहीहंडीचे पहिले बक्षीस ३ लाख ३३ हजार रुपये आहे. तर विजेत्यांना उत्कृष्ट पारितोषिक व सन्मान चिन्ह दिले जाणार आहे.
मुंबई भाजपाकडून विविध ठिकाणी दरवर्षी दहीहंडीचे आयोजन केले जाते. मुंबईतील सण उत्सव आणि परंपरा जपण्यासाठी भाजपाच्या वतीने सातत्याने प्रयत्न केले जातात. यंदाही भाजपकडून आयोजित सराव शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. १५० हून अधिक गोविंदा पथक शिबिरात सहभागी झाले होते. प्रत्येकाने साधारण पाच ते सहा थर रचून सलामी दिली. प्रत्येक पथकाला बक्षिसाने गौरवण्यात आले. मुंबईतील यंदाची दहीहंडी परिवर्तनाची असेल अशी आश्वासक प्रतिक्रिया आमदार शेलार यांनी दिली.