कृषिपंप वीजजोडणी धोरणाच्या प्रसारासाठी आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 05:23 PM2021-02-27T17:23:22+5:302021-02-27T17:23:28+5:30

राज्य शासनाने कृषिपंप वीजजोडणी धोरण-2020 जाहीर केले असून, महावितरणद्वारे त्याची अंमलबजावणी केली जात आहे.

Organized for dissemination of agricultural pump connection policy | कृषिपंप वीजजोडणी धोरणाच्या प्रसारासाठी आयोजन

कृषिपंप वीजजोडणी धोरणाच्या प्रसारासाठी आयोजन

Next

मुंबई : कृषी ग्राहकांना नवीन वीजजोडणी, दिवसा 8 तास सौर कृषी वाहिनीद्वारे वीजपुरवठा, कृषी ग्राहकांना थकबाकीत सूट देऊन मोठा दिलासा, कृषी वीजपुरवठा क्षेत्रात ग्रामपंचायती व सहकारी साखर कारखान्यांचा सहभाग व कृषी ग्राहकांच्या पायाभूत सुविधांचे सक्षमीकरण या उद्देशाने राज्य शासनाने कृषिपंप वीजजोडणी धोरण-2020 जाहीर केले असून, महावितरणद्वारे त्याची अंमलबजावणी केली जात आहे.

या धोरणाचे फायदे जास्तीत जास्त कृषी ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी राज्यभर दि.1 मार्च ते 14 एप्रिल 2021 पर्यंत कृषी ऊर्जा पर्व राबवले जाणार असून, जनजागृतीसाठी भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

 या पर्वात संबंधित जिल्ह्यांचे पालकमंत्री, खासदार, आमदार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य व कृषी ग्राहक प्रतिनिधींच्या उपस्थितीत जिल्हा, तालुका स्तरावर व मोठ्या गावांमध्ये कृषी वीज ग्राहक मेळावे आयोजित केले जाणार आहेत. यात ‘माझे वीजबिल, माझी जबाबदारी’ मोहिमेस सुरुवात केली जाणार असून, थकबाकीमुक्त झालेल्या ग्राहकांचा सत्कार, नवीन कृषी ग्राहकांना वीजजोडणी मंजुरीचे कोटेशन, वीजजोडणी प्रमाणपत्र प्रदान केले जाणार आहे. याबरोबरच ग्रामविकास विभाग व जिल्हा परिषदांच्या समन्वयाने ग्रामसभा आयोजित करून त्यात कृषी वीज धोरणाची माहिती दिली जाणार आहे.
           
 महिला सक्षमीकरण-महावितरणाचा पुढाकार या संकल्पनेअंतर्गत 8 मार्च रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून थकबाकी भरणाऱ्या महिलांचा सत्कार, महिलांच्या नावावर वीजजोडणीस प्राधान्य, थकबाकी वसुली करणाऱ्या महिला सरपंचांचा तसेच महिला जनमित्रांचा व ऊर्जामित्रांचा सत्कार, महावितरणच्या महिला कर्मचाऱ्यांच्या सक्रिय सहभागातून अंगणवाडी सेविका, आशा कर्मचारी, महिला बचत गटांचे प्रबोधन करण्यात येणार आहे.

 धोरणाच्या प्रचारासाठी जिल्हा परिषदा, जिल्हाधिकारी कार्यालये, तहसील व पंचायत समिती कार्यालये, बस स्थानके, रेल्वे स्थानके, कृषी बाजारपेठा, मार्केट यार्ड, जत्रेची ठिकाणे, आठवडी बाजारांत  होर्डिंग, पोस्टर व बॅनर लावण्यात येणार आहेत. तसेच राज्यातील सर्व बस थांब्यांवर माहिती देऊन जिंगल वाजवण्यात येणार आहे. गाव पातळीवर दवंडीद्वारे प्रचार केला जाणार आहे.
            
ग्राहक संपर्क अभियानात कृषी थकबाकीदार ग्राहकांना एसएमएस व सोशल मीडियाद्वारे धोरणाची माहिती देण्यात येणार आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून प्रत्यक्ष भेटून या धोरणात थकबाकी भरल्यास होणाऱ्या फायद्याची माहिती दिली जाणार आहे. तसेच कृषी ग्राहकांच्या शंकांचे निरसन करून वीजबिलांच्या तक्रारींचे निवारण करण्यात येणार आहे.  याबरोबरच जिल्हा, तालुका, गाव पातळीवर सायकल रॅली. जिल्ह्यांतील शासकीय कर्मचाऱ्यांचे तसेच शालेय शिक्षक विद्यार्थ्यांचे प्रबोधन, शेतकऱ्यांच्या बांधावर महावितरण, एक दिवस देश रक्षकांना, थकबाकीमुक्त गावांचा व शेतकऱ्यांचा सन्मान, प्रशिक्षकांचे प्रशिक्षण, वीज सुरक्षा व कॅपॅसिटरचे महत्त्व, शेतकऱ्यांचा पैसा – त्यांच्याच पायाभूत सुविधांसाठी, वासुदेव/पथनाट्ये, टीव्ही व रेडिओ मुलाखती आदी उपक्रमांद्वारे जवळपास दीड महिना चालणाऱ्या या मोहिमेद्वारे जनजागृती करून महावितरणतर्फे कृषी वीज ग्राहकांना वीजबिल भरण्यास प्रोत्साहित केले जाणार आहे.

Web Title: Organized for dissemination of agricultural pump connection policy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.