लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : विदेशी नागरिकांना बेकायदेशीररीत्या भारतीय पासपोर्ट, आधार कार्ड व पॅन कार्ड तयार करून देण्यासाठी संघटित टोळ्या कार्यरत असल्याबद्दल केंद्रीय सुरक्षा एजन्सीने सतर्क केल्यानंतर राज्याच्या गृह विभागाने गंभीर दखल घेतली आहे.
या संघटित टोळ्या उत्तर-पूर्व राज्यांमधील ओळख व पत्त्यांचा वापर करतात. त्यानंतर संबंधित विदेशी नागरिकाकडून तत्काळ पासपोर्ट मिळण्यासाठी अर्ज केला जातो. पोलिस पडताळणीशिवाय पासपोर्ट मिळावा असा अर्ज असतो. पोलिस पडताळणी प्रक्रियादेखील स्थानिक प्राधिकरणावर प्रभाव टाकला जातो, असे गृह विभागाच्या निदर्शनास आले आहे. या संघटित टोळ्या बेकायदेशीर स्थलांतरितांना तसेच इतर देश विघातक शक्तींना बेकायदेशीर आधार कार्ड तयार करून ते पुरवत असल्याचाही संशय आहे. यामुळे देशाच्या अंतर्गत सुरक्षेवर गंभीर परिणाम होत असल्याचे पत्र केंद्रीय गृह मंत्रालयाने राज्यांना पाठविले आहे. या पार्श्वभूमीवर, राज्याच्या गृह विभागाने सोमवारी एक परिपत्रक जारी केले. भारतीय पासपोर्टची पोलिस पडताळणी करताना संबंधित अर्जदाराचा पत्ता, गुन्हेगारी पूर्वेतिहास तसेच ओळखपत्र, वास्तव्य व इतर बाबींची योग्यरीत्या तपासणी केल्यानंतर पूर्णपणे शहनिशा झाल्यानंतर पडताळणीअंती अहवाल पासपोर्ट कार्यालयात पाठवावा, असे पोलिस यंत्रणेला बजावले आहे.