Join us

वर्सोवा ते विरार सागरी सेतूला विरोध करण्यासाठी संयुक्त सभेचे आयोजन

By मनोहर कुंभेजकर | Published: December 02, 2023 7:03 PM

श्री हरबादेवी ग्रामदेवी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष महेश पाटील व सचिव संतोष कोळी यांनी ही माहिती दिली.

मुंबई- वर्सोवा ते विरार सागरी सेतू मार्ग हा प्रकल्प किनाऱ्यापासून १ ते २ किलोमीटर अंतरावर शासनामार्फत राबवण्यात येत आहे. परिणामी मच्छिमारांच्या अस्तित्वाचा प्रश्न उपस्थित झाला असून त्याला मच्छिमारांचा ठाम विरोध आहे. सदर विरोधासंबधी एकमत घेण्यासाठी, मच्छिमारांच्या सूचना ऐकून घेण्यासाठी, त्यांना अधिक माहिती देण्याकरीता व पुढची कार्यपद्धतीसंबधी निर्णय घेण्यासाठी येत्या दि. ६ डिसेंबरला संयुक्त सभेचे आयोजन केले आहे. या सभेची नोटीस देखील जारी करण्यात आली आहे.

मढ,भाटी व वेसावे गावातील मच्छिमारांचे म्हणणे जाणून घेण्यासाठी विभागातील मच्छिमार संस्था, ग्रामस्थ पंच मंडळ, विभागतील मंडळे, यांच्यासहित श्री हरबादेवी ग्रामदेवी मंदिर ट्रस्टच्या अध्यक्षतेखाली संयुक्त सभेचे बुधवार दि. ६ डिसेंबर २०२३ बुधवार रोजी संध्याकाळी ५.०० वाजता मालाड पश्चिम,मढ हरबा देवी मंदिर गरबा मैदान येथे या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. श्री हरबादेवी ग्रामदेवी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष महेश पाटील व सचिव संतोष कोळी यांनी ही माहिती दिली.

वर्सोवा विरार सागरी सेतू प्रकल्प  "समुद्र मार्गे  तसेच समुद्राला, समुद्र किनारपट्टीवरील ज्या ज्या कोळीवाड्यांना, स्थानिक मच्छिमारांना कायम स्वरूपी बाधित करणार आहे, पारंपरिक मच्छिमारांना,  त्यांच्या व्यवसाय उपजीविकेला, समुद्रातील जैव विविधता, मत्स्य संपदा, जैविक साखळी,पर्यावरणाला  नेस्तनाबूत,नामशेष  करणार आहे.त्यामुळे वर्सोवा विरार सागरी सेतू प्रकल्प होवू देणार नाही असा एल्गार दि,22 नोव्हेंबर रोजी मालाड पश्चिम भाटी कोळीवाड्यात झालेल्या बैठकीत एमएमआरडीएचे अधिकारी आणि मत्स्यव्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यां समवेत झालेल्या संयुक्त बैठकीत वर्सोवा ते गोराई पट्यातील 11 मच्छिमार सहकारी संस्थांनी कडाडून विरोध केला होता अशी माहिती संतोष कोळी यांनी दिली.

दि. ६ डिसेंबर रोजी या महत्वाच्या सभेला मच्छिमार संस्था, ग्रामस्थ पंच मंडळ व विभाग प्रमाणे मंडळांचे पदाधिकारी, प्रतिनिधी व मढ विभाग ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने  उपस्थित रहावे अशी विनंती त्यांनी केली आहे.

टॅग्स :मुंबई