मुंबई विद्यापीठात २२ व्या राज्यस्तरीय आंतरविद्यापीठ क्रीडा महोत्सवाचे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2019 04:42 AM2019-02-13T04:42:34+5:302019-02-13T04:42:54+5:30
मुंबई विद्यापीठात २२ व्या महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ क्रीडा महोत्सवाचे आयोजन १४ ते १८ फेब्रुवारी २०१९ दरम्यान करण्यात आले आहे. या स्पर्धेत राज्यातील सर्व २० अकृषी आणि कृषी विद्यापीठे सहभागी होणार आहेत.
मुंबई : मुंबई विद्यापीठात २२ व्या महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ क्रीडा महोत्सवाचे आयोजन १४ ते १८ फेब्रुवारी २०१९ दरम्यान करण्यात आले आहे. या स्पर्धेत राज्यातील सर्व २० अकृषी आणि कृषी विद्यापीठे सहभागी होणार आहेत.
यावेळी कबड्डी (पुरुष व महिला), खो-खो (पुरुष व महिला), व्हॉलीबॉल (पुरुष व महिला), बास्केटबॉल (पुरुष व महिला), मार्ग व मैदानी स्पर्धा (पुरुष व महिला) या एकूण पाच खेळ प्रकारांचा समावेश असणार आहे. १४ ते १८ फेब्रुवारी २०१९ दरम्यान या स्पर्धा विद्यानगरी संकुल कलिना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय वडाळा, भवन्स महाविद्यालय अंधेरी आणि विद्यापीठ क्रीडा संकुल मरिन लाइन्स येथे सकाळी ७.३० पासून होणार असल्याचे कुलसचिव डॉ. अजय देशमुख यांनी सांगितले.
विद्यानगरी परिसरातील क्रीडा संकुलात सकाळी ११ वाजता राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते उद्घाटन तर समारोप राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांच्या हस्ते होईल. आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रोफेसर सुहास पेडणेकर हे असतील तर प्र-कुलगुरू प्रोफेसर रवींद्र कुलकर्णी आणि राज्यपाल नामनिर्देशित व्यवस्थापन परिषद सदस्य दीपक कुमार मुकादम यांची प्रमुख उपस्थिती असेल.
राजभवनाच्या निर्देशानुसार या क्रीडा महोत्सवाच्या आयोजनाचा पहिला बहुमान मुंबई विद्यापीठाला १९९७ ला मिळाला होता. त्यानंतर तब्बल २१ वर्षांनंतर मुंबई विद्यापीठाला या स्पर्धेच्या यजमानपदाचा बहुमान मिळाला असून हे अत्यंत अभिनंदनीय आणि अभिमानास्पद आहे.
- डॉ. उत्तम केंद्र, प्रभारी संचालक, क्रीडा व शारीरिक शिक्षण विभाग, मुंबई विद्यापीठ