मुंबई: देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत काळात 'महासंस्कृती महोत्सव २०२४' अंतर्गत विविध सांस्कृतिक कार्यक्रम राज्यभर आयोजित करण्यात येत आहेत. त्या अनुषंगाने मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून, 'मुंबई उपनगर जिल्ह्यात बौद्ध महोत्सव आणि शबरी महोत्सवाचे'आयोजन करण्यात आले आहे. पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी आज मंत्रालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना या दोन्ही कार्यक्रमाची माहिती दिली. यावेळी डॉ. भदंत राहुल बोधी देखील उपस्थित होते.
सर्वोदय महाबुद्ध विहार, टिळक नगर, चेंबूर येथे बुद्ध महोत्सव आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम २४ आणि २५ फेब्रुवारी रोजी होणार असून, त्यासाठी केंद्रीय मंत्री रामदास आठवले आणि डॉ. भदंत राहुल बोधी यांची विशेष उपस्थिती असणार आहे. सदर कार्यक्रम भिक्खू संघ युनायटेड बुद्धिस्ट मिशनच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेला आहे.
शनिवार दिनांक २४ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता केंद्रीय मंत्री रामदास आठवले, पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, डॉ. भदंत राहुल बोधी यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाचे उद्घाटन होईल. त्यानंतर भीम गीते स्पर्धा, परिसंवाद, संविधान रॅली, धम्मपद भीम गीते यासारख्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण होईल. दिनांक २५ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता कार्यक्रमाची सुरुवात होणार असून, या दिवशी सामाजिक संस्था परिचय, कला अविष्कार, महिला मेळावा, धम्म सन्मान आणि शाहीर जलसा असे कार्यक्रम बघायला मिळतील.
२७ आणि २८ फेब्रुवारी रोजी गोरेगाव (पू) येथील आरे कॉलनीमधील आदर्श नगर येथे शबरी महोत्सवाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमात आदिवासी संस्कृतीचे विविध पैलू उलगडले जातील. त्यासाठी प्रदर्शने, वैदू संमेलन, जनजागृतीपर नृत्यांचे सादरीकरण, जनजाती पूजा मांडणी, महिला संमेलन यासारख्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. सदर कार्यक्रम वनवासी कल्याण आश्रमाच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेला आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना मंत्री लोढा म्हणाले, "आपल्या भूमीला भगवान गौतम बुद्धांच्या विचारांचा अमोघ वारसा आहे. त्याचप्रमाणे आदिवासी बांधवांच्या संस्कृतीची देणगी आहे. प्रगतीच्या मार्गावर सर्वांना सोबत घेऊन पुढे जायचे असेल, तर आपला वारसा आणि संस्कृती जपणं अतिशय महत्वाचं ठरतं. त्याच अनुषंगाने आम्ही या महोत्सवाचे आयोजन केले आहे. बौद्ध बांधवांनी आणि आदिवासी बांधवांनी नेहमीच आपल्या योगदानाने समाजाच्या प्रगतीसाठी महत्वाची भूमिका बजावली आहे. त्यांच्या कार्याचा गौरव करण्याची ही संधी असून, जास्तीत जास्ती नागरिकांनी या महोत्सवामध्ये सहभागी व्हावे, असे मी आवाहन करतो."