Join us  

मुंबईत आंतरराष्ट्रीय पर्यटन महोत्सवाचे आयोजन; गिरीश महाजन यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2023 4:45 PM

मुंबईत होणाऱ्या आंतरराष्ट्रीय पर्यटन महोत्सवासाठी प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात येणार फाउंडेशनची स्थापना

मुंबई: राज्यातील पर्यटनाला चालना देऊन मुंबई शहराला जागतिक पर्यटन नकाशावर आणण्यासाठी दुबई शॉपिंग फेस्टीव्हलच्या धर्तीवर दि.२० ते २८ जानेवारी २०२४ या कालावधीत मुंबई शहर व उपनगरातील विविध विभागात मुंबई आंतरराष्ट्रीय महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. या महोत्सवाच्या आयोजनासाठी प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांच्या अध्यक्षतेखाली फाउंडेशनची स्थापना करण्यात येणार आहे. 

महोत्सवामध्ये मुंबईतील विविध क्षेत्रातील प्रथितयश स्टेक होल्डर्स सहभागी होणार असुन या महोत्सवामुळे पर्यटन वाढीस चालना मिळेल, असे मत पर्यटन मंत्री गिरीष महाजन यांनी व्यक्त केले. पर्यटन मंत्री गिरीष महाजन यांची  प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी सह्याद्री अतिथी गृह येथे भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये पर्यटन विषयावर विस्तृत चर्चा झाली. यावेळी या बैठकीस पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव राधिका रस्तोगी, पर्यटन संचालक डॉ बी. एन. पाटील व महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक श्रध्दा जोशी-शर्मा उपस्थित होत्या. 

पर्यटन मंत्री गिरीष महाजन म्हणाले की, मुंबई आंतरराष्ट्रीय महोत्सवासाठी फाउंडेशनची स्थापना करावी अशी विनंती प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी केली होती. या फाउंडेशनमध्ये शासकीय व अशासकीय सदस्यांचा समावेश असेल. मुंबई आंतरराष्ट्रीय महोत्सवासाठी फाउंडेशनच्या निर्मितीमुळे अशा महोत्सवांच्या आयोजनात सातत्य राहील व त्यात स्टेक होल्डर्सचा सहभाग वाढण्यास मदत होईल. हा महोत्सव यापुढे स्वयंपुर्ण लोकसहभागातून आयोजित होत राहील. आंतरराष्ट्रीय महोत्सवात पर्यटन क्षेत्राशी निगडीत व्यवसायिक, स्टेक होल्डर्स, मुंबईतील उद्योजक व इतर क्षेत्रातील प्रथितयश  व्यक्तींच्या सहभागामुळे या पर्यटन महोत्सवाला आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यासपीठ मिळण्यास मदत होईल.  

राज्याच्या कला व संस्कृतीचे दर्शन घडवून आणण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम, हस्तकला, राज्यातील विविध खाद्य संस्कृती, साहसी क्रीडा प्रकार जसे की, सायकलींग टूर, हार्बर टूरीझम,वॉटर स्पोर्टस्, बीच ॲक्टीव्हीटीज् इत्यादींचे आयोजन करण्यात येईल. या महोत्सवामध्ये सीटी टूर आयोजकांना एका छत्राखाली आणुन शॉपिंग मॉल, कला दालने, सिनेमा थिएटर, हॉटेल, फूड कोर्ट, साहसी क्रीडा केंद्रे, मनोरंजन केंद्रे, गाईडेड सीटी टूर, हेरिटेज वॉक,नेचर वॉक, फोटोग्राफी, योगा कार्यशाळा असे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. 

राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील पर्यटन क्षेत्राशी निगडीत व्यवसायिक व स्टेक होल्डर्स यांचा समावेश असलेल्या परिचय सहल (FAM Tour), सिनेमा, फॅशनशो इ. उपक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. या महोत्सवामुळे पर्यटना व्यतिरिक्त विविध क्षेत्रातील गुंतवणूक वाढीस मदत होईल, राज्यातील पर्यटनाला चालना मिळून मुंबई व परिसरातील पर्यटन स्थळांना प्रसिध्दी मिळेल. तसेच मुंबईतील पर्यटन वृध्दीस चालना मिळुन राज्याच्या महसूलात देखील वाढ होईल असे मत पर्यटन मंत्री गिरीष महाजन यांनी व्यक्त केले.

मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे, याचबरोबरीने या शहराला फार मोठा प्राचीन इतिहास देखील आहे, दरवर्षी बरेच पर्यटक मुंबईतील पर्यटन स्थळांना भेट देण्यासाठी येत असतात. पर्यटकांना चांगल्याप्रकारे सोई सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच पर्यटन स्थळांच्या ठिकाणी पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी शासनाकडून निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे यावेळी मंत्री महाजन यांनी सांगितले.

टॅग्स :पर्यटनगिरीश महाजनआनंद महिंद्रा